दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस खोल नाल्यात, धडगावच्या देवबारा घाटात अपघात

धडगाव : तालुक्यातील शहादा रस्त्यावरील देवबारा घाटात दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात राज्‍य परिवहन महामंडळाची बस खोल नाल्यात पडली. आज रविवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तालुक्यातील धडगाव ते शहादा रस्त्यावर देवबारा घाटात वळण रस्ता असल्‍याने समोरून येत असलेले वाहन दिसत नाही. दरम्यान, राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसचा प्रवाशांना घेवून जात असताना दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्नात बस खोल नाल्यात उतरल्याने अपघात झाला आहे.

या अपघातात कुणी जखमी नसल्याची प्राथमिक माहिती प्राप्‍त झाली आहे. बसचा अपघात झाल्‍याचे समजताच प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.