चीनमध्ये कोरोनाबळी, स्मशानात गर्दी वाढली

चीन : जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोके वर काढले असतानाच मागील महिनाभरात कोरोना महामारीचे केंद्रबिंदू असलेल्या चीनमध्ये मृतांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्मशानातील गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे चीनमध्ये कोरोनाच्या जेएन. १ या उपप्रकाराचे संक्रमण वाढले असून, मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे या देशातील स्मशाने २४ तास सुरू ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा नवा उपप्रकार जगभरात वेगाने पसरत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांत अनेक देशांमध्ये जेएन. १ च्या बाधितांमध्ये वाढ झाली असून, त्याचा वेगाने प्रसार होत असल्याचे म्हटले आहे. चिंताजनक म्हणजे, कोरोनाने हेनान प्रांतातील आरोग्य स्थिती अतिशय बिकट झाली आहे. स्मशानात मोठ्या संख्येत मृतदेह येत असून, २४ तास मृतदेह जाळण्यात येत आहेत. अन्त्यसंस्काराच्या प्रतीक्षेतील मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवण्यात येत आहेत.