तरुण भारत लाईव्ह । २५ जानेवारी २०२३। जळगावातील ड्रायफूट व्यापारी रात्री दुकान बंद केल्यानंतर घराकडे निघाला असतानाच भामट्यांनी रस्ता अडवत आठ लाखांची रोकड असलेली बॅग लांबवली. ही घटना पांडे चौकाजवळील रामदेव बाबा मंदिराजवळ सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रात्रीच्या घटनेने शहरात खळबळ
सिंधी कॉलनीतील रहिवासी मेधानी यांचे दाणाबाजारात मसाला, ड्रायफूट विक्रीचे दुकान असून ते सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दुकान बंद केल्यानंतर घरी निघाले असताना पांडे चौक ओलांडल्यानंतर रामदेव बाबा मंदिरासमोर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी दुचाकी आडवी उभी करीत रस्ता अडवला तर दुचाकीस्वारामागील भामट्याने मेधानी यांच्या जवळील कॅश, लॅपटॉप, मोबाईल असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावत पळ काढला. बॅग हिसकावून भामट्यांनी शेजारील गल्लीतून नेरी नाक्याकडे धूम ठोकली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत, निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह अधिकार्यांनी धाव घेत पाहणी केली.
भरणाची वेळ टळली अन् झाला घात
व्यापारी मेधानी यांच्या समवेत दररोज त्यांचा मुलगा दुकानावर येतो व सोबत पिता-पूत्र रात्री घराकडे दुकान बंद झाल्यानंतर निघतात मात्र सोमवारी व्यापारी मेघानी यांच्या पत्नी आजारी असल्याने मुलगाच घरीच राहिला तर मेघानी यांनी व्यापारी पेमेंट देण्यासाठी साडेचार लाख रुपये आणले होते मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ न मिळाल्याने रोकड तशीच राहिली शिवाय अन्य ग्राहकाने दिड लाखांची उधारी आणून दिली तसेच दिवसभरातील व्यवसायाचे दोन रुपये आल्यानंतर एकूण आठ लाखांची रोकड जमली व ती घेवून व्यापारी घराकडे निघाल्यानंतर घात झाला. व्यापार्याच्या पिशवीत मोबाईलही राहिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी खेडीमार्गे पसार झाल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच खेडीनजीक व्यापारी फेकलेली बॅग गुन्हे शाखेला आढळली असून त्यात कागदपत्रांसह पेन ड्राईव्ह असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 25 ते 30 वयोगटातील छबी काही ठिकाणी केंद्रीत झाली असून त्याआधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.