महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबनेची तक्रार, पोलिस ठाण्यात ठिय्यानंतर गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील नवीन बी.जे.मार्केट समोरील महापुरूषांचा पुतळा व मूर्ती काढून विटंबना केल्यासह धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी गुरूवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात प्रशांत शरद देशपांडे याच्यासह जेसीबी चालक व साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजाता संतोष ठाकूर (३७, रा. पिंप्राळा-हुडको) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून या प्रकारामुळे सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू, पुतळा व मूर्ती विधीवत पुन्हा बसविण्यात आल्यानंतर गोंधळ शांत झाला होता.

नवीन बी.जे.मार्केटसमोरील एका जागेवरती सन १९५२-५३ पासून वसाहत होती. या वसाहतीमध्ये ६० ते ६५ कुटूंब राहत होते. याठिकाणी सन १९८३ मध्ये नगरपालिका व शासनाच्यावतीने महापुरूषांचा पुतळा व मूर्ती बसविण्यात आली होती. या पुतळ्याची व मूर्तीची रहिवासी देखरेख करीत होते. नंतर सन १९९९ मध्ये ही वसाहत स्थलांतर झाली. दरम्यान, गुरूवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रशांत शरद देशपांडे, अमित एकनाथ पाटील व त्याचे साथीदार हे विना क्रमांकाचा जेसीबी घेवून नवीन बी.जे.मार्केटसमोरील जागेच्या ठिकाणी आले. त्यांनी महापुरूषांचा पुतळा असलेल्या जागेच्या गेटचे कुलूप तोडून जेसीबीसह आत प्रवेश केला.

मोठा जमाव एकत्र
हा प्रकार अमर सपकाळे, शांताराम सोनवणे, मिलिंद सोनवणे, मिलिंद शिरसाठ, सतिरू गायकवाड, विजय निकम यांनी सुजाता ठाकूर यांना संपर्क साधून सांगितला. काही वेळात त्या त्याठिकाणी आल्यावर त्यांना जेसीबीच्या सहाय्याने महापुरूषांचा पुतळा व मूर्ती काढून टाकण्यात आलेला दिसला. त्यांनी लागलीच इतर लोकांना बोलवून घेतले. सकाळी ७ वाजता प्रचंड जमाव याठिकाणी जमला होता. या जमावाने ठिय्या मांडत पुतळा हटविण्यास विरोध केला. जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, जिल्हापेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह शहरातील सहाही पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

विधिवत पुतळा, मूर्ती बसविली…
मोठा जमाव जमला म्हणून प्रशांत देशपांडे याच्यासह जेसीबी चालक व त्यांच्या साथीदारांनी तेथून पळ काढला. त्यानंतर काही प्रतिष्ठीत लोकांना मिळून काढलेला पुतळा व मूर्ती पुन्हा विधीवत पूजा करून बसविली. त्यानंतर गोंधळ शांत होवून जमावाकडून जल्लोष करण्यात आला.

गुन्हा दाखल करा, अन्यथा पोलिस ठाण्यातून जाणार नाही..
पुतळा व मूर्ती बसविल्यानंतर पुतळ्याची विटंबना करणार्‍या आणि धार्मिक भावना दुखविणा-यांविरूध्द गुन्हा दाखल व्हावा, यासाठी सकाळी ११ वाजेनंतर जमावातील शेकडो लोक जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या आवारात दाखल झाले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यातून जाणार नाही, असा पवित्रा जमावाकडून घेण्यात आल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सुजाता ठाकूर यांच्या फिर्यादीवरून प्रशांत देशपांडे यांच्यासह इतरांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दोन्ही सभागृहात तक्रार
विधान सभेत भाजपते जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी याप्रश्‍नी प्रश्‍न उपस्थित करून याप्रश्‍नी संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी केली. याप्रश्‍नी दखल घेण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर विधान परिषदेत माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी प्रश्‍न उपस्थित करून कारवाईची मागणी केली.