जळगावमध्ये ग.स. सभेत राडा; गोंधळातच सर्व विषय मंजूर

जळगाव :  जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी ग. स. सोसायटीची ११५  वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार (दि. १८) नूतन मराठा महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.  मात्र , सभासदांनी गोंधळ केल्याने सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय मंजूर करुन सभा आटोपती घेतली.   व्यासपीठावर उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, गटनेते अजबसिंग पाटील, भाईदास पाटील, योगेश सनेर, विपीन पाटील, महेश पाटील, अजय देशमुख, अनिल गायकवाड, अजयराव सोमवंशी, मनोज माळी, सुनील सूर्यवंशी, रागिणी चव्हाण, प्रतिभा सुर्वे, विजय पवार, मंगेश भोईटे, अमरसिंग पवार, विश्‍वास पाटील, नीलेश पाटील, प्रवीणकुमार कोळी, ज्ञानेश्‍वर सोनवणे, योगेश इंगळे, रावसाहेब पाटील, माजी अध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह संस्थेचे आजी-माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष उपस्थित होते.

सभा सुरू होताच व्यासपीठावरून अध्यक्ष उदय पाटील यांच्या सूचनेनुसार, विषयपत्रिकेवरील विषय मांडण्यायेत होते.  विषय मांडत असताना लेखापरीक्षण अहवालावर सदस्य गणेश देशमुख यांनी आक्षेप घेत माइकवर बोलण्याची विनंती केली. मात्र, त्यांना माइक देण्यात आला नाही. त्यामुळे सभेत गोंधळ उडाला.

यावेळी एका सदस्याने पदाधिकार्‍यांकडून शिवीगाळ केल्या जात असल्याचा आरोप करीत जाब विचारला.  यामुळे  गोंधळात भर पडली.  सभेत काही सभासदांनी व्यासपीठासमोर येऊन एका सभासदाने विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देण्याची जबाबदारी अध्यक्षांची असल्याचे सांगितल्याने चांगलाच गोंधळ उडाला. अध्यक्ष उदय पाटील हे काय स्वत:ला सोसायटीचे मालक समजताहेत का, असा प्रश्‍न सभासद स्वराज्य पॅनलप्रमुख आर. के. पाटील यांनी उपस्थित केला. त्यानंतर सोमनाथ पाटील, चाळीसगावचे विनोद पाटील, विक्रम सोनवणे आदींनी अध्यक्षांना जाब विचारल्यानंतर गोंधळात आणखी भर पडली.

व्यासपीठावर चढून सभासद विनोद पाटील यांनी अध्यक्ष पाटील यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू करण्यात आल्याने वादावर पडदा पडला.

सभा गोंधळातच आटोपल्याने ती पुन्हा घेण्याची मागणी सभासद गणेश देशमुख, विक्रम सोनवणे, आर. के. पाटील यांच्यासह सभासदांनी केली. सभासदांना अध्यक्षांकडून धमकावले जात असल्याचा आरोप गणेश देशमुख यांनी केला. दरम्यान, तक्रारदार सभासदाने मागितलेली माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आहे, तसेच त्यांचे समाधान होत नसेल तर सोसायटी कार्यालयात अहवाल दाखविण्यात येईल, असे सांगितले. मात्र, सभासदाचे समाधान होत नसेल तर काय करणार, असे सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी सांगितले.