---Advertisement---
जळगाव शहरासह जिल्ह्यात तापमानात चढ-उतार सुरू असून शुक्रवारी एकाच दिवसात कमाल तापमानात तब्बल ४ अंशांची वाढ नोंदवली गेली. मात्र, याचवेळी रात्रीच्या किमान तापमानात घट झाल्याने पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका कायम आहे.
गुरुवारी जळगावचे कमाल तापमान २५.२ अंश सेल्सिअस होते, ते शुक्रवारी वाढून २९.३ अंशांवर पोहोचले. दुसरीकडे गुरुवारी ११.३ अंश असलेले किमान तापमान शुक्रवारी घसरून १०.८ अंशांपर्यंत खाली आले. परिणामी, दिवसा उन्हाचे चटके जाणवत असतानाच रात्री गारवा अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून उत्तरेकडून वाहणारे थंड वारे काहीसे थांबले आहेत. याच कारणामुळे कमाल तापमानात वाढ झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, रात्री आणि पहाटे वातावरणात गारवा टिकून आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही तापमानवाढ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगावच्या आकाशात ढगांचे आवरण असून, ढगाळ वातावरण कमी झाल्यानंतर आणि पुन्हा उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्यास जळगावमध्ये थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.









