महाराष्ट्रात ठरवून घडवल्या जाताय दंगली

भुसावळ : राज्यात दंगली या ठरवून केल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी भुसावळात आयोजित पत्रकार परीषदेत केला. फैजपूर शहरात शुक्रवारी होत असलेल्या आदिवासी हक्क परीषदेनिमित्त ते जिल्ह्यात आले असून भुसावळ शहरातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी सकाळी 11 वाजता माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा झाल्यानंतर आम्ही लोकसभा निवडणुका लवकरच होतील, असे म्हटले होते व आता तर भाजपाने 48 मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केल्याने मुदतपूर्व लोकसभा निवडणुका होतील, असा दावाही आंबेडकरांनी यावेळी केला. राज्यातील दंगलीमागे कोण आहे? या प्रश्नावर आंबेडकरांनी बोलणे टाळणे असलेतरी नागपूर एसआयटीने सहा महिन्यांपूर्वी शासनाला अहवाल दिला असून तो जाहीर झाल्यास सर्व बाबी समोर येतील, असा दावाही अ‍ॅड.आंबेडकर यांनी येथे केला. राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले असून देनापूर व नांदेडमधील घटना त्याचे उदाहरण आहे. हत्या करणार्‍या आरोपीला जात नसते मात्र अल्ताफ व हुसेन ही नावे दर दोन मिनिटांनी टीव्हीवर दाखवली जातात त्यामुळे अशी नावे आल्यानंतर समाज सांगण्याची गरज उरत नाही तर पालघरच्या घटनेमागे देशपांडे, भिडे नाव आल्यानंतर माध्यमे ही नावे दाखवत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

औरंगजेबही याच मातीतला
औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्याच्या प्रश्नावर अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, औरंगाबाद व खुलताबाद हे ऐतिहासीक शहरे असून औरंगजेबदेखील याच मातीतला आहे त्यामुळे इतिहास मिटवू नये, असे वाटते. संभाजीराजेंचा औरंगाबादशी फारसा संबंध आला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. आम्ही आघाडीसोबतच आहोत मात्र नाना पटोले यांनी मध्यंतरी केलेल्या वक्तव्याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत खर्गेंनी या संदर्भात बाजू मांडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच आम्हाला तुम्ही आघाडीतच असल्याचे स्पष्ट केल्याने आम्ही निर्धास्त आहोत. आगामी निवडणुकांमध्ये चर्चा करूनच निर्णय घेवू, असेही त्यांनी सांगितले.

तर ईडी अधिकार्‍यांना लटकविल्याशिवाय राहणार नाही
राज्यासह केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपाने ईडीचा वारेमाप गैरवापर केला मात्र आता अधिकार्‍यांनी स्वतःला वाचवण्याची वेळ आली आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर या अधिकार्‍यांना लटकाविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. एखादा अधिकारी मंत्र्यांच्या सांगण्यावरून चुकीचे काम करीत असल्यास तसा शेरा त्याने त्या फायलीवर लिहावा जेणेकरून त्या अधिकार्‍यावर कारवाई होणार नाही, अशा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत, असे अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले. आम्ही सत्तेत आल्यानंतर ‘त्या’ ईडी अधिकार्‍यांना नाचवणार असेदेखील ते म्हणाले.

क्रांतीकारी निर्णयाचे स्वागतच !
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका कार्यक्रमात लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच केल्यानंतर अ‍ॅड.आंबेडकर यांना त्याबाबत छेडले असता ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने सर्वकाही एकदम स्पष्ट केले आहे. हात, पाय, शरीर बांधून त्यांनी निर्णय दिला आहे मात्र आता मिलिंद नार्वेकरांनाच व्हीपचे उल्लंघण झाले आहे वा नाही? याबाबत निर्णय द्यायचा आहे मात्र सरळ-सरळ व्हीप उल्लंघण झाल्याचे दिसत असल्याचे आंबेडकरांनी सांगत नार्वेकरांनी काढलेल्या वक्तव्याचे स्वागत केले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, युवा नेते सुजात आंबेडकर, भारीपचे युवा नेते अशोक सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा.सुनील सुरवाडे, माजी युवा जिल्हाध्यक्ष व आदिवासी हक्क परीषद निमंत्रक बाळा (विजय) पवार, राज्य कार्यकारीणी सदस्य व आदिवासी हक्क परीषदेच्या निमंत्रक शमिभा पाटील आदींची उपथिस्ती होती.

अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर उवाच

1) राज्यातील एक लाख 36 हजार आदिवासींना जात प्रमाणपत्राअभावी नोकरीतून काढण्यात आले मात्र त्यांच्या जागेवर पुन्हा आदिवासींची भरती करा ही आमची आदिवासी हक्क परीषदेतील पहिली मागणी आहे व मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येतील

2) आदिवासींच्या प्रश्नांवर कुणीही आंदोलन करीत नाही मात्र आम्ही सुरूवात केली आहे.

3) आदिवासी आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचन असावे ही मागणी आहे त्यामुळे अंतर निश्चित होवून विद्यार्थ्यांना ताजे अन्न मिळेल शिवाय डीबीटी योजना रद्द करून जुनीच पद्धत अवलंबण्याची आमची मागणी आहे.

4) गौतमी पाटीलच्या भूमिकेचे संभाजी राजेंनी केलेले समर्थन योग्यच आहे, पाटील ही जात नाही मात्र सामाजिक भानही राखणे गरजेचे आहे.

5) सोने 80 हजार तोळा निश्चित जाणार, जळगाव ही सोन्याची बाजारपेठ, काही दिवस वाट पहा, निश्चित भाव वाढणारच !