---Advertisement---
नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत आमदार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) ने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली असून, त्यात शैला व्यवहारे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर नगरसेवक चेतन बऱ्हाटे यांची उपगटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
शैला व्यवहारे यांनी नशिराबाद शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत एक सकारात्मक, विश्वासार्ह आणि जनाभिमुख प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आमदार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची नशिराबाद नगरपरिषद शिवसेना (शिंदे गट) च्या गटनेतेपदी निवड केली आहे.
गटनेतेपदाचे कार्य….
नगरपालिकेत एखाद्या पक्षाचे सर्वाधिक किंवा प्रभावी नगरसेवक असतील, तर त्या पक्षाच्या नगरसेवकांचा प्रमुख म्हणून गटनेत्याची निवड केली जाते. गटनेता हा नगरपालिकेतील पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी मानला जातो. पक्षाच्या सर्व नगरसेवकांमध्ये समन्वय राखणे, नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती व इतर बैठकीत पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणे, विकासकामे, प्रस्ताव व ठरावांबाबत पक्षाची दिशा ठरवणे, नगराध्यक्ष व प्रशासनाशी समन्वय साधणे तसेच नगरसेवकांच्या समस्या व प्रश्न वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवणे, या गटनेत्याच्या प्रमुख जबाबदाऱ्या असतात.









