विशाल महाजन
पारोळा : शहरात मोकाट गुरांचा संचार दिवसागणिक वाढत आहे. गुरांचा काफ़िला शेतात जावून उभी पिके नेस्तनाबूत करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना मोकाट गुरे डोकेदुखी ठरत असून प्रशासनाने मोकाट गुरे मालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवर गुरांचा वावर सुरू असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत असून गुरांना गाडीने उडविल्याचा घटनाही घडत असल्याने बजरंग दलाच्या वतीने मोकाट गुरांचे मालकांना आपापली गुरे बांधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीने आठ दिवसाच्या आत गुरे न बांधल्यास सदरील गुरे अमळनेर येथील गौ शाळेत टाकण्यात येतील असा इशाराच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. नॅशनल हायवे नंबर सहावर, महावीर नगर, मडक्या मारोती चौक, राममंदिर चौक कजगाव नाका, सानेगुरुजी कॉलनी अश्या महत्त्वाच्या रस्त्यांवर व चौकात गुरे फिरतांना दिसतात. तर काही जनावरे रस्त्यात बसतात. किसान महाविद्यालय ते थेट बाजार समिती पर्यत मोकाट गुरांचा मुक्त संचार आढळून येतो.
मुख्य रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे रस्त्यावर बसतात़ त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट जनावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. सोबतच गुरांना ही नाहक जीव गमवावा लागत आहे.
नॅशनल हायवे नंबर सहावर एका गुराला भरधाव गाडीने उडविल्याची घटना नुकतीच घडली आहे. परिणामी गौरक्षका मध्ये तो थरार पाहून व शेतकऱ्याच्या व्यथा पाहून संतापाची लाट आहे. आपापली गुरे संबंधित व्यक्तीने बांधावी अन्यथा गौशाळेत पाठविण्यात येतील असे शेतकऱ्यांनी कळविले आहे.
मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा
मोकाट गुरे पिकांची नुकसान करीत असल्याने आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. मोकाट गुरांचा बंदोबस्त करा अथवा गौशाळेत पाठवा
– भैय्या महाजन
शेतकरी, पारोळामोकाट गुरे मालकावर कारवाई करा
मोकाट गुरांचा वावर वाढल्याने उभी पिके नेस्तनाबूत करीत आहे. मुलाप्रमाणे वाढवलेल्या पिकाला क्षणार्धात जमीनदोस्त करीत असल्याने मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मोकाट गुरे मालकावर प्रशासनाने कारवाई करावी.
-भूषण महाजन
शेतकरी,पारोळा