पंच परिवर्तनांसह शताब्दी वर्षात संघाची अ.भा. कार्यकारी मंडळाची बैठक उद्यापासून

#image_title

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सामजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व आधारित जीवन शैली आणि नागरिक कर्तव्य या पंच परिवर्तनांचा उल्लेख केला आहे. याच पंच परिवर्तनांसह शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या कार्याचा विस्तार करणार आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक मथुरा येथील गौ ग्राम पस्खम येथील दीनदयाल उपाध्याय गौ विज्ञान आणि अनुसंधान केंद्र येथे २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. बैठकीविषयी माहिती देण्यासाठी परखम येथे आयोजित पत्रपरिषदेत सुनील आंबेकर बोलत होते. ते म्हणाले की, माननीय सरसंघचालकांनी विजयादशमीच्या पावन पर्वावर जे विचार व्यक्त केले त्याविषयी तसेच त्यांच्या उ‌द्बोधनातील विषयांच्या अंमलबजावणीसाठी विविध योजनांवर या बैठकीत चर्चा होईल. तसेच वर्तमान स्थितीतील समसामायिक विषयांवरही मंथन केले जाईल. सोबतच मार्च २०२४ मध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेत निर्धारित वार्षिक योजनांची समीक्षा आणि संघ कार्याच्या विस्ताराचा आढावाही घेतला जाईल. बैठकीत विशेष करून संघ शताब्दीनिमित्त ठरविण्यात आलेल्या संघटनात्मक उद्दिष्टांना २०२५ च्या विजयादशमीपर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात विचारविनियम केला जाईल.

यंदा विजयादशमीला सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात अनेक विषयांकडे लक्ष वेधले. इंटरनेटचा समाज आणि बालकांवर होणारा परिणाम, यावरही चर्चा होईल. महर्षी दयानंद सरस्वती, भगवान बिरसामुंडा, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर, राणी दुर्गावती जयंती सोबतच झारखंडमधील अनुकूल चंद ठाकूर यांच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या ‘सतसंगत’ अभियानासह अनेक विषयांवरील कार्यक्रमांची चर्चा होईल. बैठकीला अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या रचनेतील सर्व ४६ प्रांत आणि सह प्रांत संघचालक, कार्यवाह तसेच प्रचारक अपेक्षित असतात. बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे तसेच सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, डॉ. सी. ए. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर, आलोक कुमार आणि अतुल लिमये, अन्य अखिल भारतीय कार्य प्रमुख आणि कार्यकारिणी सदस्यांसह ३९३ स्वयंसेवक उपस्थित राहतील. पत्रपरिषदेला पश्चिम उत्तरप्रदेशचे क्षेत्र संघचालक सूर्यप्रकाश टोंक, अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर आणि प्रदीप जोशी उपस्थित होते.