तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव- जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी हितासाठी वेळोवेळी योग्य ती संकल्पना निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल. यासह जिल्हा दूध संघाचे कामकाज व्यवस्थापन सुव्यवस्थितरित्या चालवून दूध संघाला जिल्ह्यातच नव्हेतर राज्यात प्रथम क्रमांकाचा दूध संघ बनविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष आ. मंगेश चव्हाण यांनी केले.
जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आ.मंगेश चव्हाण प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत जिल्हा दूध संघाचे सुरू असलेले कामकाज सुव्यवस्थितरित्या चालविण्याला प्राधान्य राहिल, यातील सर्व प्रक्रियेसह अन्य कामकाज नियमितरित्या समजून घेत सर्वांना सोबत घेउनच कामकाज केले जाईल. मात्र चुकीचे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. जिल्हा दूध संघाच्या गत काळातील झालेल्या गैर व्यवहार संदर्भात झालेले सर्व व्यवहारांची तपासणी केली जाईल. याबाबत योग्य तो निर्णय होईलच, परंतु सध्यातरी कोणतेही भाष्य करणे उचित नसल्याचेही नसल्याचे अध्यक्ष आ.चव्हाण यांनी सांगीतले. सर्वानुमते अध्यक्षपदाची निवड
जिल्हा दूध संघाच्या मुख्य कार्यालयात रविवार १८ रोजी सकाळी अध्यक्षपदासाठी दूध संघाचे संचालक तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, संचालक चिमणराव पाटील यांच्यासह अन्य संचालक मंडळाच बैठक पार पडली. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी आ.मंगेश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकार) संतोष बिडवई यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणे, छाननी व त्यातून उमेदवारांची निवड अशी निवड प्रक्रिया होती. परंतु जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आ. मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने सर्वानुमते दूध संघाच्या अध्यक्षपदी आ.चव्हाण यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दूध संघाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड झाल्याची घोषणा झाल्यानंतर मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
यांची होती उपस्थिती
यावेळी दूध संघाचे संचालक तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आ.चिमणराव पाटील, आ. सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, अरविंद देशमुख, शामल झांबरे, पूनम पाटील, प्रमोद पाटील, माजी आ. दिलीप वाघ, संजय पवार आदी संचालक उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि चेअरमन आ. मंगेश चव्हाण यांनी सर्वांच्या मदतीने दुध संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची ग्वाही दिली.