जळगाव: पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी शासकीय पातळीवर सुरू असतानाच राजकीय क्षेत्रातील अनेकांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली होती. 2024 मध्ये विद्यमान खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर असे दोन मतदारसंघ आहेत. दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा प्रभाव आहे. 2019 च्या निवडणुकीत जळगाव मतदारसंघात उन्मेष पाटील हे विजयी झाले होते.
त्यांना 7 लाख 13 हजार मते होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना 3 लाख 2 हजार मते होती. उन्मेष पाटील यांना सरासरी 66 टक्के मते होती. जिल्ह्यातील दुसऱ्या रावेर मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे या विजयी झाल्या होत्या. त्यांना 6 लाख 55 हजार तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना 3 लाख 19 हजार मते पडली होती. झालेल्या मतदानापैकी सुमारे 60 टक्के मतदान हे रक्षा खडसे यांना होते. या दोघांचा पाच वर्षांचा कार्यकाळ आता पुढील वर्षी पूर्ण होत आहे. इच्छुकांची तयारी सुरू दोन्ही लोकसभा मतदारसंघात आता इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
यात प्रामुख्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची संख्या जास्त आहे. विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा 2019 ते 2024 हा पाच वर्षांचा कार्यकाळ. ते पहिल्यांदाच निवडून आले. त्यापूर्वी ते आमदार होते. राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांचा ओढा हा भाजपकडे जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघात उन्मेष पाटील यांच्यासह रोहित निकम हेदेखील स्पर्धेत आहेत. यासह आमदार मंगेश चव्हाण यांचे नावही चर्चेत आहे, तर नेहमीप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून जळगाव मतदारसंघावर दावा केला जात आहे.
पक्षाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी शहरात वाढदिवसानिमित्त लावलेल्या फलकांवर त्यांची उमेदवारी व भावी खासदार असा उल्लेख करून धक्कातंत्राचा अवलंब केला, तर रावेर मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यासह डॉ.केतकी पाटील यादेखील इच्छुक आहेत. डॉ. केतकी पाटील यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क गत वर्ष दिड वर्षात वाढविल्याचे लक्षात येते. यासह अमोल जावळे, डॉ. अतुल सरोदे यांची नावेही चर्चेत आहेत. गेल्या निवडणुकीत ‘मोदी लाटेत’ सर्व पक्षांना प्रचंड फटका बसला. जळगाव जिल्ह्यातही तीच परिस्थिती होती. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना झालेल्या मतदानाच्या 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मतदान झाल्याचे लक्षात आले.
कामांचा प्रभाव
देशातील भाजप सरकारच्या गत चार वर्षांच्या कार्यकाळात झालेले निर्णय, कामांचा धडाका याचा प्रभाव भविष्यातील निवडणुकांवर दिसणार आहे. तळागाळातील व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवत अनेक कामे किंवा निर्णय झालेले आहेत. या बाबीचा प्रभाव ग्रामीण भागात दिसून येत असतो. याचे परिणाम भाजपची उमेदवारी मिळावी असेच इच्छुकांकडून प्रयत्न होत असल्याचे लक्षात येते.