जळगाव : जिल्ह्यात सध्यास्थितीत लम्पी नियंत्रणात आल्याचा दावा केला जात असला तरी जिल्ह्यात बाधित गुरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. एकट्या जामनेर तालुक्यात लम्पीमुळे 450 गुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जामनेर लम्पीचा हॉटस्पॉट ठरला आहे. तसेच पाचोरा तालुक्यात पुन्हा लम्पीची गुरांना बाधा झाली आहे.
जिल्ह्यात लम्पीचा कहर सुरूच असून सोमवारी पाचोरा तालुक्यात 7 गुरे बाधित असल्याचे आढळून आले आहेत. जिल्हाभरातील 15 तालुक्यात 25 हजार 778 गुरे बाधित झाले आहेत. सोमवारी 21 नोव्हेंबर रोजी प्राप्त अहवालानुसार पाचोरा तालुक्यात 7 गुरे लम्पी बाधित आढळून आली आहेत. यापूर्वी मुक्ताईनगर, रावेर, यावल, बोदवड तालुका लंपीने हॉटस्पाट ठरला होता. मात्र, या तालुक्यात लंपीची लाट ओसरत असली तरी जामनेर तालुका मात्र त्याला अपवाद ठरला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात बाधित गुरांची आकडेवारी कमी झाल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात 25 हजार 776 लम्पपीने बाधित गुरांवर उपचार करण्यात आले आहे. तर 21 हजार 553 गुरे उपचारानंतर बरे झाली आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 116 गुरांचा मृत्यू झाला आहे. लवकरच गुरांवरील लंपीचा प्रभाव नियंत्रणात येऊन लाट ओसरण्याची शक्यता असताना जामनेर तालुक्यात लम्पीचा उद्रेक वाढला आहे.
जामनेर तालुका लम्पीचा हॉटस्पाट ठरत असून त्यानंतर मुक्ताईनगर, रावेर, यावल, बोदवड, चोपडा या तालुक्यात लम्पी बाधित गुरे आढळून येत आहेत. त्यामुळे लंपीची दुसरी लाट येते की काय असा तर्क तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात माझा गोठा, स्वच्छ गोठा अभियान राबविले जात असून बर्यापैकी लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी फलदायी ठरत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.व्ही. सिसोदे यांनी सांगितले.