जळगाव : दुचाकी चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात भडगाव पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सखोल चौकशीतून त्याने आठ दुचाकी चोरल्याची कबुली देत त्या काढुन दिल्या. पोलिसांनी सुमारे २ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. अमोल शांताराम पाटील (रा. गिरड ता.भडगाव) असे संशयिताचे नाव आहे. गुजरात, मध्यप्रदेश तसेच पाचोरा परिसरातून त्याने या दुचाकी चोरल्या असल्याचे तपासातून निष्पन्न झाले.
१३ जानेवारी रोजी रात्री पंडीत झिपरु बोरसे (वय ४७, रा. गिरड) यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीक्यू ५९१५) ही घरासमोरुन चोरट्याने चोरुन नेली होती. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून तपास पोलीस हेड कॉन्सटेबल किरण पाटील हे करीत होते. दरम्यान ही दुचाकी अमोल पाटील रा. गिरड हा चोरी करुन घेवून गेल्याची गोपनीय माहिती भडगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरीष्ठांच्या मार्गदर्शनात पथकाने तपासाला गती देत अमोल याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यानंतर
त्याला गुरुवार, १८ रोजी अटक करुन न्यायालयातून चार दिवसांची कोठडी घेतली. या दरम्यान त्याची विचारपूस केली असता त्याने इतर दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्या पोलिसांना काढुन दिल्या. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हेड कॉन्सटेबल किरण पाटील, हेकॉ हिरालाल पाटील, हेकॉ निलेश ब्राम्हणकर, पोलीस नाईक मनोहर पाटील, पोलीस कॉन्सटेबल सुनील राजपुत, पोलीस कॉन्सटेबल प्रवीण परदेशी यांनी ही कारवाई केली.
असा आहे जप्त मुद्देमाल
भडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी क्र. एमएच १९ डीक्यू ५९१५, अंकलेश्वर पोलीस ठाण्यात दाखल तीस हजार किमतीची होन्डा शाईन, २५ हजार किमतीची होन्डा सीडी, पाचोरा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी ५० हजार किमतीच्या तीन पल्सर, २५ हजार रुपये किमतीची स्पेल्डर प्लस, कुकशी पोलीस ठाणे (म.प्र.) २० हजार किमतीची दुचाकी असा एकुण २ लाख ८५ हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.