---Advertisement---
Jalgaon News : महापालिका प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध विभागातील निवडणुकीच्या अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ड्यूटी निश्चित केली आहे. मात्र गुरुवारी तब्बल १५० अर्ज आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे आले असून, या अर्जामध्ये ड्यूटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान कुठल्याही परीस्थितीत ड्युटी रद्द होणार नसून जे अनुपस्थित राहतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिला आहे.
कामासाठी निवडणुकीच्या नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे, उमेदवार आमच्या शिक्षण संस्थेचे असल्याचे तसेच इतर वैयक्तिक कारणे देत ड्यूटीवर हजर राहणे शक्य नसल्याचे नमूद केले आहे. या अर्जामुळे प्रशासनात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक प्रक्रियेतील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी या परिस्थितीवर कठोर भूमिका घेतली आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक प्रक्रियेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांनी हजर राहणे बंधनकारक आहे. कोणताही कर्मचारी विनाकारण अनुपस्थित राहिल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. निवडणूक ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया असून, त्यात हयगय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.









