---Advertisement---
जळगाव/धुळे : खान्देशात निवडणुकीसाठी महापालिका मतदानापूर्वीच भाजपने विजयी सलामी दिली आहे. धुळे महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी पार पडलेल्या छाननीत प्रभाग १ ‘अ’मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजित भोसले आणि प्रभाग ६ ‘ब’मधील उमेदवारी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील, तर जळगाव महापालिकेत प्रभाग १२ ‘ब’मधून भाजपच्या उमेदवार उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. खान्देशातील भाजपच्या तिन्ही महिला उमेदवारांनी विजयी सलामी दिल्याने हा पक्षासाठी शुभशकुन मानला जात आहे. बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर उमेदवारांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आतषबाजी करून जल्लोष केला.
धुळे महापालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी पार पडली. छाननीप्रसंगी प्रभाग १ ‘अ’ मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजित भोसले व प्रभाग ६ ‘ब’मधील ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली. या वेळी भाजपचे महानगर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी नगरसेविका भारती माळी, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुनील कपिल, पवन जाजू, देवपूरचे मंडळाध्यक्ष प्रथमेश गांधी, विजय वाघ, भाजप काम गार आघाडीचे विजय पवार आदी उपस्थित होते.
जळगावात भाजपचा विजयी जल्लोष
जळगाव महापालिकेच्या प्रभाग १२ ‘ब’ ओबीसी महिला या प्रवर्गातून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात वैशाली पाटील आणि भारती चोपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील वैशाली पाटील यांनी इतर आणखी दोन प्रभागांत अर्ज दाखल केले आणि भारती चोपडे यांनी अर्ज भरताना त्यात त्रुटी ठेवल्या. त्यामुळे भारती चोपडे यांचा अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आला, तर वैशाली पाटील यांनी दाखल केलेल्या इतर दोन प्रभागांपैकी दुसऱ्या प्रभागात आधी अर्ज दाखल केला.
त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या प्रभागातीमल अर्ज ग्राह्य धरीत १२ ‘ब’मधील अर्ज तांत्रिकदृष्ट्या निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कुवर यांनी बाद ठरविला. त्यामुळे प्रभाग १२ ‘ब’मध्ये केवळ भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध निश्चित झाली. या वेळी मोहन बेंडाळे, भाजपचे महानगर-जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, दीपमाला काळे, पिंटू काळे यांच्यासह समर्थकांनी जल्लोष केला.









