GMC : पालकमंत्र्यांच्या हस्ते अतिदक्षता विभाग,उपकरणांचे उदघाटन

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्ह्यासह शेजारील राज्य मध्य प्रदेशातील बहुतांश गरीब व गरजू रुग्ण हे अत्यावस्थ स्थितीत अत्यावश्यक उपचार घेणेकामी दाखल होत असतात. रुग्णालयात दिवसेंदिवस वाढत असलेली अत्यावस्थ रुग्णांची संख्या विचार घेऊन या रुग्णालयात अजून एक अत्याधुनिक अशा यंत्रसामुग्री, साधनसामुग्रीसह सुसज्ज अतिदक्षता विभागाची उभारणी करण्याचा मानस अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे विचाराधीन होता. सदर बाब ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार रुग्णालयात एक अत्याधुनिक मॉड्युलर आयसीयु तयार करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातुन २ कोटी ५० लाख इतका निधी मंजूर करुन दिला.

अत्याधुनिक आयसीयू
सदर मॉड्युलर आयसीयु हे औषधवैद्यकशास्त्र विभागांतर्गत असून त्यामध्ये एकुण-१४ खाटा आहेत. यामध्ये दाखल होणा-या जळगाव जिल्हा तसेच इतर भागातील गोरगरीब रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळून अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. यास्तव रुग्णसेवेचे हित लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची या रुग्णालयातील उभारणी करण्यात आली आहे, असे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.

या अतिदक्षता विभागात सतत माहिती देणारे १४ मल्टिपॅरा मॉनिटर आहेत. सदर मॉनिटर हे नर्सिंग स्टेशनच्या संगणक प्रणालीस वायरलेस पध्दतीने जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची शारिरीक स्थितीबाबतची माहिती सतत अद्यावत होत असते. त्यानुसार संबंधीत रुग्णांवर उपचार करण्यात येत असतात. मॉड्युलर पध्दतीच्या आयसीयुमध्ये रुग्णांना जंतुसंसर्गाचा धोका फार कमी प्रमाणात असतो.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी विविध विकासकामांचा आढावा आपल्या मनोगतातून मांडला. तसेच, आणखी काही समस्या असतील त्या पुढील काळात सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असेही सांगितले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे,  उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. संजय चौधरी, विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी राजसिंह छाबरा यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले. आभार डॉ.अक्षय सरोदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दिलीप मोराणकर, निलेश बारी, प्रकाश पाटील, मोहन पाटील, विश्वजीत चौधरी, राकेश सोनार, दीपक सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.