जळगाव : जळगाव शहराचा विकासाचा सेतू व वाहतूकीसाठी सोयीच्या ठरणारा पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे उद्या, १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता लोकार्पण होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला जळगाव येथून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार आदींची उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘महारेल’ ( महाराष्ट्र रेल इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ) द्वारे पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.
या उड्डाणपूलामुळे शिवाजीनगरसह पिंप्राळावासियांची वाट सुकर होणार आहे. उड्डाणपूल उभारणीसाठी १२ सप्टेंबर २०२२ रोजी पिंप्राळा रेल्वेफाटक बंद करण्यात आले होते. जळगाव ते शिरसोली स्थानकादरम्यान असलेल्या पिंप्राळा रेल्वे फाटक क्रमांक १४७ वर असलेला हा रेल्वे उड्डाणपूल दोन लेनचा आहे. पूलाची लांबी १००५.६२ मीटर असून रूंदी ८.५ मीटर आहे. या उड्डाणपूलास ५३ कोटी ९१ लाख खर्च आला आहे. रिंग रोडपासून सुरू झालेला हा उड्डाणपूल थेट कानळदा रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे जळगावकरांना विलंबाशिवाय आता थेट शिवाजीनगरसह प्रस्तावित राज्यमार्गावरून थेट चोपडा तालुक्याकडे मार्गस्थ होता येणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा एक आर्म पिंप्राळा उपनगराकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रेल्वे फाटकामध्ये होणारी वाहतुकीची कोंडीची समस्याही दूर होणार आहे.
पिंप्राळा उड्डाणपुलाचे कामकाज गतीने पूर्ण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेसाठी जळगावचे उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर व त्यांच्या टीमने खूप परिश्रम घेतले, तर एमजीएनएफ फेलो दुशांत बांबोळे यांनी समन्वय साधला असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
पूलाचे ठळक वैशिष्ट्ये
० पुलाच्या कामात ‘कंपोझिट’ स्टील गर्डर्सचा वापर
० आरसीसीचे ५४ गर्डर्सचे काम
० पुलाच्या सुरक्षेसाठी ‘क्रॅश बॅरियर’ या नव्या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. अनेक केबल्स लाईन्स आहेत ज्या सामान्यत: पुलांच्या मार्गावरून जातात, ज्यामध्ये विद्युत लाईन्स, टेलिफोन लाईन्स इत्यादी तारा हानीकारक असू शकतात आणि अपघातास आमंत्रण देणारे होऊ शकतात. हे टाळण्यासाठी, महारेलने केबल्सच्या वितरणासाठी पूलावर क्रॅश बॅरियर्समध्ये एक स्वतंत्र केबल डक्ट सुरू केला आहे.
० रात्रीच्या दृष्यमानतेसाठी दूरस्थ नियंत्रित ‘थीम’वर आधारित एलईडी पथदीप , सजावटीच्या कमानींसाठी एलईडी दिव्यांची सुविधा
० विशेष सण आणि स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी आणि इतर अनेक प्रसंगी संपूर्ण पुलावर बहुरंगी प्रकाशयोजना.
० इलेक्ट्रो केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CECRI) द्वारे विकसित केलेल्या इपॉक्सी पेंट सिस्टमचा वापर