अनुकंपाधारक ४५० कर्मचाऱ्यांचा नोकरीत समावेश ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मानले आभार

जळगाव : अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून अनुकंपाधारक कर्मचारी यांना सुमारे 450 कर्मचाऱ्यांना नोकरीत समावेश केले आहे. पाणी पाजणे हे पुण्य कर्म असून त्यासाठी प्रत्येक अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांनी, सतत प्रयत्नशील राहावे. जलजीवन मिशनमुळे पाणीपुरवठा विभागाला झळाळी आली आहे असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी येथे रविवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अनुकंपा कृती समितीच्या वतीने जाहीर सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

म. जी .प्रा. च्या इतिहासात अनुकंपा भरती प्रक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात पुर्णत्वास आली. गेली 20 वर्ष विविध आंदोलने, धरणे तसेच उपोषणाच्या माध्यमातून अनुकंपाधारक न्यायेच्या प्रतिक्षेत होता. अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात आतापर्यंत 450 अनुकंपाधारकांना नोकरी मिळाल्याने या कुटुंबियांचे पुनर्वसन त्यांनी केले. त्याबद्दल राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या अनुकंपाधारकांनी त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेपाळमध्ये जळगाव जिल्ह्यातील वरणगाव, तळवेल व भुसावळ परिसरातील अपघातात मृत झालेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर जल, ‘हर घर नल’ या जल जीवन मिशन योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून राज्यातील जनतेपर्यंत पाणी पोहोचवीत असल्याचे आत्मिक समाधान मिळत असल्याने मला माझ्या खात्याचा अभिमान वाटतो. आतापर्यंत 450 अनुकंपधारकांना नोकरी मिळाल्याने या कुटुंबियांचे प्रकारे पुनर्वसन झाले असून याशिवाय प्रत्यक्ष यादीतील उर्वरीत सुमारे 150 अनुकंपाधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनास निर्देश दिलेले असून त्या अनुषंगाने कार्यवाही देखील सुरू असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

प्रास्ताविक मुंबईचे सतीश सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन ठाण्याचे रुपेश बंदरकर यांनी केले तर आभार अमरावतीचे किशोर लाहे यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, जेष्ठ पत्रकार दिपक झंवर, मुन्ना झंवर, राज्यातील विविध भागातून आलेले कार्यरत कर्मचारी सतिश सांगळे, अविनाश गडगे, सुनील भेरे, विजय माळी, काशिफ कुरेशी, किशोर लाहे, अमोल बोरकर, पुष्पराजे पुरे, संदीप कोरडे, मंजुनाथ गवळी, श्री मोंडेकर, भक्तराम फड, संतोष नागरे, प्रविण तेजारे, अमित जाधव, शाहीद मुल्ला, अजय यादव, महेश पाटील, सागर पाटील, विनुस शेख, श्रीमती यामिनी जोशी, स्वप्नील कुलकर्णी, निलेश कांडेकर, प्रशांत जोगी, नितेश भागवत आदींची प्रमुख उपस्थिती होती.