तरुण भारत लाईव्ह।१५ जानेवारी २०२३। इतक्या वर्षांपासून सोबत असूनही आमच्या प्रभागांमध्ये विकास कामे होत नाहीत. याबाबत वेळोवेळी महापौर, उपमहापौर यांना सांगूनही आमच्यावर होणार्या अन्यायाविरोधात लढायचे असेल तर यांची साथ सोडावी लागेल, असे म्हणत महानगरपालिकेतील सत्तेला सुरुंग लावत तीन नगरसेवकांनी 14 रोजी पाळधी गाठत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यात मनोज आहुजा, किशोर बाविस्कर व रेखाबाई सोनवणे या तीन नगरसेवकांचा समावेश आहे.
संक्रांतच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जळगावातून सकाळीच एक गोड बातमी मिळाली. महापौर, उपमहापौर हे काम करीत नसल्याच्या कारणांनी 14 रोजी मनपाचे नगरसेवक मनोज आहुजा, किशोर बाविस्कर तसेच नगरसेविका रेखाबाई सोनवणे यांचा मुलगा उमेश सोनवणे यांनी सकाळी 10 वाजेला पाळधी गाठत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश झाल्याचे छायाचित्र समाज माध्यमांद्वारे जाहीर केले. यानंतरही शिंदे गटात प्रवेशासाठी आठ ते दहा नगरसेवक उत्सुक असल्याचीही चर्चा आहे. या प्रवेशावेळी त्यांच्या सोबत प्रतापराव पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, अॅॅड. दिलीप पोकळे, चेतन सनकत यांच्यासह गजानन देशमुख, कुंदन काळे, हर्षल मावळे, उमेश सोनवणे उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या अवघ्या आठ महिन्यावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी काम करत नाही. या कारणानांना कंटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत बाळासाहेबांच्या शिवसेनेत नगरसेवकांच्या एका मागून एक प्रवेशाने जळगावातील निवडणुकीपूर्वीच वातावरण बदलणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहे.
याबाबत गेल्या 22 महिन्यांपासून परिवर्तन व्हावे यासाठी शिवसेने सोबत होतो. यातून प्रभागाचा विकास आणि विकासाच्या माध्यमातून जनतेचे कल्याण हेच एक ध्येय होते. पण महापौर, उपमहापौर यांना अनेकदा आमच्या प्रभागांनाही निधी देण्यासंदर्भात सांगितले. त्यावर त्यांच्याकडून फक्त होकार मिळायचा. उलटपक्षी आलेल्या प्रत्येक निधीतून दोघांच्या प्रभागातील कामे होत होती. उपमहापौरानी तर दोन ते अडीच कोटींची कामे मनपा फंडातून केली. आम्हीही पर्यावरण विभागाच्या वृक्षारोपण समितीच्या कामांसाठी आलेल्या अडीच कोटींच्या निधीतून चाळीस ते पन्नास लाखांची कामे करून द्या, असे सांगितले. त्यावर त्यांनी दुसर्याच नगरसेवकांची कामे यात समाविष्ट केल्याची माहिती नगरसेवक किशोर बाविस्कर, नगरसेवक मनोज आहुजा यांनी दिली. यामुळे आम्ही शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती त्यांनी दूरध्वनीद्वारे दिली आहे. तर अजूनही काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेशासाठी उत्सूक असल्याचे बोलले जात आहे.