Anganwadi Sevaka Emolument । अवघ्या दोन दिवसात नवरात्र सुरू होणार आहे. अशातच राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना नवरात्र भेट दिलीय. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची “जनसन्मान यात्रा” आज मंगळवारी लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघात पोहोचली. यावेळी अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये केल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आम्ही सक्रीयपणे काम करत आहोत, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असून यामध्ये डॉ. अफसर शेख व नाझेर काझी हे उत्तम काम करत आहेत असा पुनरुच्चार त्यांनी केला. आम्ही सर्वांसोबत सर्वसमावेशकपणे काम करण्यास कटिबद्ध आहोत, आम्ही सर्व भारतीय आहोत. उदगीर हे भारताचे सार प्रतिबिंबित करते आणि आपण सामाजिक सलोखा राखला पाहिजे, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे, असे सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व महायुतीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात तर आम्ही तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.