Maharashtra Politics : राज्यात सत्ता बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र असे असताना सत्ताधारांपासून ते विरोधकांपर्यंत या चर्चा निव्वळ अफवा असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, रोज कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे किंवा घडामोडीमुळे या चर्चांना पुन्हा पुन्हा बळ मिळत आहे. आता तर चक्क मंत्रालयात देखील याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सरकार बदलणार असल्याच्या उघड उघड चर्चा होत आहेत. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.
तसेच अंतिम टप्प्यात काम असलेल्या कंत्राटदारांमध्ये देखील धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यात सत्ताबदल होईल असा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजप नाराज असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा देखील झाली. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मंत्रालयात खळबळ उडाली आहे.
शरद पवार यांनी ‘आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यात सत्ताबदल होईल अशी चर्चा मंत्रालयात रंगली आहे. याबाबत मंत्राल्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उघड उघड चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांमुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची डोकेदुखी देखील वाढली आहे. मंत्रालयात येणारे आमदार आणि इतर लोक आपले कामे पटापट संपवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे अग्रह धरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरील दबाव वाढला आहे.