न्यूझीलंड संघाने मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर ५० धावंनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकसमोर ३६३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला डेव्हिड मिलर याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर ५० ओव्हरमध्ये ९ गडी गमावून ३१२ धावाच करता आल्या. डेव्हिड मिलरच्या शतकी खेळीनेही दक्षिण आफ्रिकेला विजयी करता आलं नाही. मात्र डेव्हिड मिलरच्या या खेळीने न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहण्यास भाग पाडलं. मात्र आता पुन्हा एकदा न्यूझीलंडसमोर फायनलमध्ये टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. हा सामना रविवारी ९ मार्चला दुबईत होणार आहे.
न्यूझीलंड १६ वर्षांनंतर फायनलमध्ये
न्यूझीलंडची या विजयाने १६ वर्षांची प्रतिक्षा संपवली. २००९ नंतर न्यूझीलंडने पहिल्यांदा तर एकूण तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम सामन्यात विजय मिळवत चॅम्पियन्स होण्याची बरोबरची संधी आहे. मात्र कोणती टीम चॅम्पियन्स होते? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. टीम इंडियाला या अंतिम सामन्यानिमित्ताने किवींचा धुव्वा उडवत २५ वर्षांपूर्वीचा हिशोब बरोबर करण्याची संधी आहे.
२५ वर्षांपूर्वी काय झाल होतं ?
२००० नंतर इंडिया विरुद्ध न्यूझीलंड हे दोन्ही संघ पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहे. २००० साली न्यूझीलंडने अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती.त्यामुळे आता टीम इंडियाकडे फायनलमध्ये विजय मिळवून २५ वर्षांपूर्वीचा हिशोब करण्याची संधी आहे. टीम इंडियाने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेतून बाहेर केलं आणि २०१७ फायनलचा हिशोब बरोबर केला. त्यानंतर उपांत्य फेरीत कांगारुंना लोळवत वनडे वर्ल्ड कप 2023 चा वचपा काढला. त्यामुळे आता टीम इंडियाने न्यूझीलंडच्या २००० सालच्या पराभवाची परतफेड करावी आणि मायदेशी चॅम्पियन्स ट्रॉफी आणावी, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.