IND vs SL: श्रीलंका मालिकेसंदर्भात 4 मोठे अपडेट आले समोर

भारताचा श्रीलंका दौरा २७ जुलैपासून सुरू होत आहे. येथे टीम इंडियाला फक्त 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. एकीकडे या दौऱ्यावर सीनियर खेळाडू खेळणार नसल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे टी-20 टीममध्ये कर्णधाराबाबत वाद सुरू आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचेही हे पहिलेच काम असल्याने श्रीलंकेविरुद्धची मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आता क्रिकबझच्या एका अहवालात टीम इंडियाच्या संघाबाबत 4 मोठे अपडेट्स समोर आले आहेत.

T20 मधून निवृत्ती घेतलेला रोहित शर्मा सध्या USA मध्ये सुट्टी घालवत आहे. रोहितचे पुनरागमन झाले तर वनडे मालिकेतील टीम इंडियाचे कर्णधारपद त्याच्या हाती येईल.

श्रेयस अय्यर हा असा फलंदाज आहे जो या वर्षी देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे बीसीसीआयच्या करार यादीतून वगळण्यात आला होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याची कामगिरी काही खास नव्हती. पण आयपीएल 2024 मध्ये त्याने आपल्या कर्णधारपदाखाली केकेआरला चॅम्पियन बनवले आहे. टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी त्याचे चांगले संबंध असल्याने त्याचे भारतीय संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे, केएल राहुलने जानेवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीनंतर भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. राहुलचे वनडे मालिकेत पुनरागमनही जवळपास निश्चित असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, मला तिन्ही फॉरमॅटमधील सर्व वरिष्ठ खेळाडूंची उपलब्धता हवी आहे. पण आता विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर राहू शकतात अशी बातमी समोर आली आहे. विराट आणि बुमराहला ब्रेक दिल्याने गंभीर खूश नसल्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी, तरीही त्यांच्याकडून मालिकेत खेळण्याची फारशी आशा दिसत नाही.

रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल बीसीसीआयला माहिती देणार असल्याच्या अफवा आहेत, परंतु तरीही तो ब्रेक सुरू ठेवण्याची किंचित शक्यता आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल श्रीलंकेविरुद्ध वनडे संघाची कमान सांभाळू शकतो.