भारत आणि युके यांच्यात आयटी-आरोग्यसेवा क्षेत्रात सहकार्य वाढणार!

नवी दिल्ली : भारत आणि युके यांच्या दरम्यान व्यापारी संबंध दृढ होण्यासाठी उभय देशांमध्ये आयात-निर्यात वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे भारत-यूके एफटीए या महिन्यात दुसऱ्या फेरीची चर्चा होणार आहे. या फेरीत भारत व युके यांच्यात व्हिस्की, ईव्ही आणि चॉकलेट्स या गोष्टींची व्यापार वाढण्याची शक्यता आहे. तसेच, माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात रोजगारसंबंधी चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान, भारतासोबतच्या व्वापारात युकेकडून विविध वस्तूंवरील आयात शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ब्रिटनमध्ये स्टार्मर यांचे सरकार आल्यानंतर भारत आणि ब्रिटन यांच्यातील राजनैतिक संबंध दृढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जानेवारी २०२२ मध्ये सुरू झालेली प्रस्तावित मुक्त व्यापार करार(एफटीए) चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. दोन्ही राष्ट्रांत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे चर्चेची १४ वी फेरी स्थगित करण्यात आली होती.

पंतप्रधान क्वीर स्टार्मर यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आगामी काळात भारत दौरा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्टार्मर यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले आहे. एकंदरीत, भारत-युके(एफटीए) चर्चेत नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर, प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि वाटाघाटी बंद करण्यासंदर्भात उभय देशातील वरिष्ठ अधिकारी या महिन्यात चर्चेची पुढील फेरी आयोजित करतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.