नवी दिल्ली : बंडखोर सैन्याने राष्ट्राध्यक्ष बशर असद यांच्या हुकूमशाही सरकारचा पराभव केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने आपल्या ७५ नागरिकांना सुरक्षितरीत्या सीरियातून बाहेर काढले.
दमास्कस आणि बैरूतमधील भारतीय दूतावासाने सीरियातून नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम यशस्वी केली. त्यांनी तेथील सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर ही मोहीम पार पाडण्यात आली, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली.
सीरियात अलिकडेच झालेल्या घडामोडींच्या पृष्ठभूमीवर भारत सरकारने आज ७५ नागरिकांना सुरक्षितरीत्या या देशातून बाहेर काढले, असे मंगळवारी रात्री उशिरा जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. सुटका करण्यात आलेल्यांत ४४ जण जम्मू- काश्मिरातील असून, ते सैदा शैनाब येथे अडकले होते. सर्व भारतीय नागरिकांनी सुरक्षितरीत्या सीरियाची सीमा पार करीत लेबनॉनमध्ये पोहोचले. ते व्यावसायिक विमानाने भारतात परततील, असे या निवेदनात म्हटले आहे.
विदेशात असलेल्या भारतीयांची सुरक्षा आणि सुरक्षिततेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. सीरियातील भारतीय नागरिकांनी दमास्कस येथील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले. सीरियातील परिस्थितीवर सरकार बारीक नजर ठेवून आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
सीरियातील काही महत्त्वाची शहरे ताब्यात घेतल्यानंतर बंडखोरांनी दमास्कसमध्ये प्रवेश केल्यानंतर असद सरकार रविवारी कोसळले होते. हयात तहरीर अल-श्याम या बंडखोर संघटनेने सीरियाचा ताबा घेतल्यानंतर असद यांनी रशियात पळ काढला होता. या माध्यमातून असद कुटुबीयांची ५० वर्षांची सत्ता संपुष्टात आली.
असद हे रशियात आले असून, ते मॉस्कोत आहेत. त्यांना राजकीय आश्रय देण्यात आला, असे रशियातील सरकारी माध्यमांनी स्पष्ट केले. त्यांची कारकीर्द यादवी, रक्तपात आणि विरोधकांवरील अत्याचारांमुळे गाजली होती.