---Advertisement---
भारत हा जगाला धर्म देणारा आणि विश्वकल्याणाची कामना करणारा देश आहे. येथे वेदांमध्ये सर्व शास्त्र सामावलेले आहेत. एवढेच नाही तर ऋषीमुनींच्या तपस्येमुळे राष्ट्र अधिक बलवान आणि ओजस्वी बनले आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काढले.
राजस्थानातील सीकर जिल्ह्यात श्री जानकीनाथ बडा मंदिर, रेवासा धाम येथे ब्रह्मलीन स्वामी राघवाचार्य वेदांती महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘श्री सियपिय मिलन समारोह’ यात ते बोलत होते. यावेळी सरसंघचालकांच्या हस्ते स्वामी राघवाचार्य यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आणि नवनिर्मित गुरूकुल भवनाचे लोकार्पणही झाले. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, जेव्हा इतिहासाने डोळेही उघडले नव्हते तेव्हापासून भारत संपूर्ण जगाला सत्य, धर्म आणि आध्यात्माचा मार्ग दाखवित आहे आणि मानवतेच्या
कल्याणासाठी कार्य करत आहे.
सनातन काळापासूनच हीच परंपरा कायम आहे. अनेक चढ-उतार आले. आम्ही कधी स्वतंत्र होतो, कधी वैभवसंपन्न होतो तर कधी पारंत्र्यात गेलो आणि दारिद्र्यही पाहिले. तरीही हे कार्य सातत्याने सुरूच राहिले. जेव्हा जेव्हा जगाला धर्म, सत्य आणि आध्यात्माची गरज भासली तेव्हा भारताची प्रतिमा उंचावली.
सरसंघचालक पुढे म्हणाले की, सत्य एकच आहे, तेच विश्वरूप आहे आणि तेच विविध रूपात दिसते. खोटेपणा काही काळपर्यंतच चालू शकतो, नंतर सगळे काही एका सत्यतत्वातच विलीन होतात. याविषयी आपल्या संतांच्या कथाही अतिशय प्रेरक आहेत. रामकृष्ण एकदा पंचवटी येथे गंगेला न्याहाळत बसले असताना ध्यानधारणेत लीन झाले आणि आसपासच्या दृश्यात एकरूप झाले.
त्याचवेळी समोरच्या हिरवळीवरून एक गाय गेली. रामकृष्ण आपल्या एकतत्वात असे काही विलीन झाले होते की त्यांच्या छातीवर गायीच्या पावलांचे ठसे उमटले. इतकी तन्मयता गाठण्याची क्षमता आपल्यात आहे आणि याची गुरूकिल्ली आपण लोककल्याणासाठी वापरली पाहिजे.
ऋषी-मुनींनी विचार केला होता की, सर्व एक आहेत, सर्व आपलेच आहेत. ही महान भावना आपण जगाला दिली पाहिजे. पण, संपूर्ण विश्वाला ही भावना देण्यासाठी एक व्यक्ती पुरेशी नाही. यासाठी एका संपूर्ण राष्ट्राने जीवनध्येय बनवून जगले पाहिजे. याच उद्देशान आपल्या ऋषी-मुनींनी आपल्या तपस्येद्वारे या राष्ट्राची निर्मिती केली आहे, असेही डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
संकटकाळातही लोकशाही अबाधित ठेवली
स्वातंत्र्यानंतरचा आपला इतिहास पाहिला तर इतिहासाच्या आधारे कोणी हा तर्क लावू शकत नव्हते की भारत इतकी प्रगती करेल. आजही भारताची घोडदौड सुरूच आहे आणि जगात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकांनी भविष्यवाणी केली होती की येथे लोकशाही राबवताच येणार नाही. येथे लोकशाही केवळ अंमलातच आली नाही तर ती टिकली आणि जेव्हा यावर संकट आले तेव्हा देशातील लोकांनी याचा प्रतिकार करत लोकशाही अबाधित ठेवली. आज आश्चर्यकारकरित्या भारत एक लोकशाही देश म्हणून जगापेक्षा कितीतरी पुढे आहे, असे मोहनजी म्हणाले.