---Advertisement---
---Advertisement---
कोची (केरळ) : भारत हे केवळ एक नाव नाही, तर ते एका संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यात बदल करू नये किंवा त्याचा अनुवादही करू नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले. देशाला आज जगभरात जो सन्मान मिळतो, त्याचे मूळ भारत या अस्सल ओळखीमध्ये आहे, असे ते म्हणाले.
कोची येथील एका कार्यक्रमात भागवत बोलत होते. ते म्हणाले की, भारत हेच योग्य नाव आहे. त्याचे भाषांतर केले जाऊ नये. इंडिया देंट इज भारत, हे खरे असले तरी भारत हा भारतच आहे. त्यामुळेच लिहिताना आणि बोलताना आपण भारताला भारतच म्हटले पाहिजे. भारत हा भारतच राहिला पाहिजे.
भारत म्हणून असलेल्या ओळखीतूनच त्याचा आदर केला जातो. आपण आपली ओळख पुसून टाकली, तर इतर कोणतेही चांगले गुण असले, तरी या जगात आपला सन्मान होणार नाही, सुरक्षितता मिळणार नाही. हाच मूळ नियम आहे. ते पुढे म्हणाले की, इतिहासातील परकीय सत्तांप्रमाणे भारताने कधीही विस्तारवाद किंवा शोषणवाद अवलंबिला नाही. विकसित भारत, विश्वगुरू भारत हा आतासुद्धा युद्धाचे कारण बनणार नाही किंवा कुणाचे शोषण करणार नाही. आम्ही सर्वांना संस्कृती शिकवली, असे ते म्हणाले.