---Advertisement---
नवी दिल्ली : भारत अफगाणिस्तानमधील आणि द्विपक्षीय संबंध बळकट करण्याला आमचे प्राधान्य आहे. भारत आमचा सर्वांत जवळचा मित्र असून, त्यांनी संकटाच्या काळात आम्हाला नेहमीच मदत केली आहे. आम्ही कोणत्याही गटाला आमच्या भूमीचा वापर इतरांविरुद्ध करू देणार नाही. हवाई तळ, लष्करी तळाचा वापर चुकीच्या कामासाठी करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे भारत दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी म्हटले आहे.
आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या मुत्ताकी यांनी शुक्रवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर संयुक्त पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी जयशंकर यांनी काबुल येथे भारतीय दूतावास सुरू करण्याची घोषणा केली.
त्यानंतर मुत्ताकी म्हणाले. अफगाणिस्तान कोणत्याही सैन्यदलाला इतर देशांविरुद्ध आपला भूभाग वापरण्याची परवानगी देणार नाही. आमचे भारतासोबतचे संबंध व्यापार आणि परस्पर आदरावर आधारित आहे. अफगाणिस्तानात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भारताने केलेल्या गुंतवणुकीमुळे विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी म्हटले, सीमापार दहशतवाद विकासासाठी मोठी समस्या असून, दहशतवादाविरोधात भारताकडून करण्यात येणाऱ्या कारवाया आणि उपाययोजनांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेची कशी फजिती झाली हे जगाने पाहिले, त्यामुळे पाकिस्तान किंवा अमेरिकेने आमच्या नादाला लागू नये, असा इशारा मुत्ताकी यांनी दिला.
विमान सेवांचा करणार विस्तार
जयशंकर म्हणाले, अफगाणिस्तानातील खाणकामासाठी भारतीय कंपन्यांना दिलेल्या संधीचे आम्ही स्वागत करतो. यावर पुढे चर्चा केली जाईल. व्यापार आणि वाणिज्य वाढविण्यात आमचे समान हित आहे. काबुल आणि दिल्ली दरम्यान विमान सेवांचा विस्तार केला जाणार आहे.
सीमापार दहशतवाद रोखण्यासाठी सहकार्य
एस. जयशंकर म्हणाले, काबुलमध्ये भारतीय दूतावास सुरू केले जाईल. व्यापार, वैद्यकीय मदत आणि इतर सुविधा पुखण्यासाठी याचा फायदा होणार आहे. भारत अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. विकासासाठी असलेली सामायिक वचनबद्धता, सीमापार दहशतवादामुळे धोक्यात आली आहे. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करणार असून यावर बैठकीत एकमत झाले आहे.









