---Advertisement---
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांत चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारांचा उद्देश दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवणे आणि परस्पर संबंध मजबूत करणे आहे. व्यापार, सुरक्षा, शिक्षण आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भागीदारी वाढवण्याच्या दिशेने हे करार एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस भारतीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी मार्कोस यांचे स्वागत करण्यात आले. मोदी आणि मार्कोस यांच्या झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांस्कृतिक आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य, तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली.
यावेळी मोदी म्हणाले की, भारत-फिलिपाईन्सच्या राजनैतिक संबंधाला ७५ वर्षे पूर्ण झाले असले तरी, दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध शतकानुशतके जुने आहे. फिलिपाईन्समधील रामायणातील महाराडिया लावना ही कथा याचे एक मोठे उदाहरण आहे. दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा उद्देश मैत्री आणि परस्पर सहकार्य अधिक मजबूत करणे आहे.
दोन्ही देशांतील संबंध मजबूत
तंत्रज्ञान, आणि व्यापार अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलत आहे आणि सभोवतालच्या भूराजनीतीमुळे निर्माण झालेल्या संधीचा दोन्ही देशांना फायदा होईल. आगामी काळात भारत आणि फिलिपाईन्समधील संबंध दृढ होतील आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढेल, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. यावेळी ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिल्याबद्दल फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांचे मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले.
स्मारक टपाल तिकिटे जारी
एका विशेष कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे स्मारक टपाल तिकिटे जारी केली. ही टपाल तिकिटे भारत आणि फिलिपाईन्समधील मजबूत आणि ऐतिहासिक संबंधांचे चित्रण करतात. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंधांचे स्मरण करण्यासाठी हे तिकिटे जारी करण्यात आले.