नवी दिल्ली : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेला धार्मिक स्वातंत्र्याचा अहवाल भारताने फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “आम्ही धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल नाकारतो. या अहवालात मोठ्या प्रमाणावर पक्षपातीपणा आहे आणि भारताच्या सामाजिक जडणघडणीच्या आकलनाचा अभाव आहे.”
पुढे बोलताना रणधीर जयस्वाल म्हणाले की, “या अहवालात विशिष्ट प्रकारची कथा तयार करण्यासाठी निवडक घटनांची निवड करण्यात आली आहे.” ते पुढे म्हणाले की, “अहवालात भारतीय न्यायालयांनी दिलेल्या काही कायदेशीर निर्णयांच्या अखंडतेला आव्हान दिलेले दिसते.” असे मत रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केले.
“अमेरिकेने जाहीर केलेला हा अहवाल अत्यंत पक्षपाती आहे, चुकीचे सादरीकरण, तथ्यांचा निवडक वापर, पक्षपाती स्त्रोतांवर अवलंबून राहणे आणि समस्यांचे एकतर्फी अंदाज यांचे मिश्रण म्हणजे हा अहवाल आहे.” अशी टीका त्यांनी अहवालात एका विशिष्ट प्रकारची कथा तयार करण्यासाठी जुन्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.
अमेरिकेने बुधवारी धार्मिक स्वातंत्र्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता आणि भारतात अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेष वाढत असल्याचे या अहवालात दावा करण्यात आला होता. भारतातील अल्पसंख्याक गटांवर हिंसक हल्ले होत असल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालात मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराचाही संदर्भ देण्यात आलेला आहे.