तरुण भारत लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२२ । भारत विरुद्ध बांगलादेशमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली. त्यानंतर त्याच्यासोबत इतर २ खेळाडूही दुखापतग्रस्त झाले आहेत.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघाने मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळणार नाही, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले. तो कसोटी खेळू शकेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण बोटाला झालेल्या दुखापतीनंतर तो तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी मायदेशी परतणार आहे.
हे दोन खेळाडू दुखापत
दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज दीपक चहर हा हॅमस्ट्रिंगमुळे तिसऱ्या वनडेला मुकणार असून कुलदीप सेन पाठीच्या दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही, अशी माहितीही द्रविडने दिली. राहुल द्रविड म्हणाले की, रोहित १४ डिसेंबरपासून चितगाव येथे सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळू शकेल की नाही याची मला खात्री नाही.
द्रविड पुढे म्हणाले, ‘रोहित, कुलदीप आणि दीपक तिसऱ्या सामन्यात खेळणार नाहीत. रोहित मुंबईत परतेल आणि तज्ज्ञांना बोटाच्या दुखापतीची स्थिती दाखवेल. तो कसोटी मालिकेत खेळू शकेल की नाही हे आम्ही आताच सांगू शकत नाही. पराभूत झालेल्या सामन्यात धाडसी अर्धशतक झळकावल्यानंतर रोहित म्हणाला, ‘ही (बोटाची दुखापत) योग्य नाही. काही डिसलोकेशन आहेत आणि काही टाके आहेत. मी नशीबवान आहे की ते फ्रॅक्चर झाले नाही, त्यामुळे मी फलंदाजीला येऊ शकलो.