---Advertisement---
आम्ही जुलैमध्ये भारतासोबत केलेला मुक्त व्यापार करार आर्थिक विकासाला चालना देणारा मार्ग आहे. हा करार केवळ कागदाचा तुकडा नाही, तर विकासासाठी एक लाँचपॅड आहे. भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि २०२८ पर्यंत तिसरी मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. भारतासोबचा व्यापारी करार आमच्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे मत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी निवेदनात म्हटले आहे.
दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले कीर स्टार्मर यांचे बुधवारी मुंबई आगमन झाले. त्यावेळी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रिद्वय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांचे स्वागत
केले. हॉटेल ताज येथून ते फिल्म सिटीला पोहोचले. स्टार्मर यांनी म्हटले की, भारतासोबतचा व्यापार करार दोन्ही देशासाठी अतुलनीय संधी आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत गुरुवारी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी चर्चा होणार आहे. वस्तूंवरील शुल्क अतिशय माफक असल्याने २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट होईल. भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे.
दरम्यान, स्टार्मर यांच्यासोबत ब्रिटनमधील १२५ प्रमुख व्यावसायिक नेते, उद्योजक आहे. त्यात रोल्स रॉइस, ब्रिटिश टेलिकॉम, डियाजियो, लंडन स्टॉक एक्सचेंज आणि ब्रिटिश एअरवेज यासारख्या प्रमुख कंपन्यांचे उच्च अधिकाऱ्यांचा समावेश आहे.