---Advertisement---
पठाणकोट : भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला गुडघे टेकवण्यास भाग पाडले होते. ही मोहीम केवळ एक नमुना होती. शत्रूच्या एका चुकीची आम्ही वाट पाहत आहोत. त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्यास भारतीय लष्कर ऑपरेशन सिंदूर-२ सुरू करेल. यावेळी पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी दिला आहे.
पंजाबच्या पठाणकोट येथील लष्करी तळावर सुरू असलेल्या युद्ध सरावाच्या अखेरच्या दिवशी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लेफ्टनंट जनरल पुष्कर म्हणाले, भारतीय लष्कराकडून सुरू असलेला सराव ऑपरेशन सिंदूर २.० चा भाग आहे. शत्रूवर कारवाईची वेळ आल्यास हल्ल्याची व्याप्ती मागच्या वेळेपेक्षा खूप जास्त असेल. गेल्या वर्षी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळालेल्या यशाचा उल्लेख करताना ते म्हणाले, भारताने पाकिस्तानला कठोर संदेश दिला आणि त्यावेळी अवघ्या चारच दिवसांत गुडघे टेकायला भाग पाडले. पाकिस्तानला लहानसा नमुना दाखवला होता. ऑपरेशन सिंदूर २ साठीची तयारी भारतीय लष्कराने केली आहे. ही मोहीम कशा प्रकारे पार पडेल याबद्दल मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, कारण ते आपल्याला शत्रूचे किती नुकसान करायचे, यावर अवलंबून असेल. आम्ही तिन्ही मार्गांनी कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भारताला कमकुवत समजणे ही त्यांची चूक असेल.
अण्वस्त्र धमक्यांना घाबरत नाही – लेफ्टनंट जनरल कटियार
‘वेस्टर्न कमांड’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी सांगितले की, लष्कर भविष्यातील कोणत्याही परिस्थितीसाठी पूर्णपणे तयार असून अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरणार नाही. भविष्यातील कोणत्याही संघर्षाचा निकाल निर्णायक असेल. या वेळी आम्ही पूर्वपिक्षा अधिक चांगल्या प्रकारे तयार आहोत आणि आमच्याकडे भविष्यासाठी स्पष्ट योजना आहे.









