केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारविरुद्ध मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मी पुन्हा येणार’ याचे सूतोवाच केले होते.पण काल १५ ऑगस्टच्या दिवशी त्यांनी राष्ट्राला संबोधित करताना आपल्या या वक्तव्यावर ठाम राहात, ‘मी पुन्हा येणार आणि भारतीयांची स्वप्ने पूर्ण करणार,’ अशी ग्वाहीच जणू समस्त भारतीयांना देऊन, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपला विजय कसा दृष्टिपथात आहे, हे देखील देशवासीयांना दाखवून दिले. स्वातंत्र्य दिनी राष्ट्राला संबोधित करताना देशवासीयांशी जवळीक साधताना त्यांनी नेहमीच्या शैलीत यावेळी थोडा बदलही केला.
एरवी भाषणात ‘मेरे प्यारे भाईयो और बहनोंं’ या शब्दांची पेरणी करणा-या मोदींनी कालच्या भाषणात ‘माझ्या प्रिय देशवासीयांनो’ असे संबोधन वापरून गेल्या ९ वर्षांत केलेल्या कामकाजाचा लेखाजोखाच १४० कोटी जनतेपुढे ठेवला. आता आपण जगातील सर्वांत मोठी लोकशाही तर आहोतच; पण अनेकांच्या मते लोकसंख्येच्या दृष्टिकोनातूनदेखील आपण जगात पहिल्या क्रमांकावर आहोत, हेही त्यांनी नमूद केले. पूज्य बापूजींना नमन करून, मोदींनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या असहकार आंदोलन, सत्याग्रहाची आठवण काढली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासारख्या असंख्य वीरांच्या बलिदानाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला.
शाच्या स्वातंत्र्य चळवळीत यच्चयावत नागरिकांनी दिलेल्या योगदानाचेही त्यांनी स्मरण केले. या देशात सत्तेवर यायचे तर येथील राष्ट्रीय मूल्ये जोपासली गेली पाहिजे, हे मोदींच्या मनात ठासून भरले आहे. त्यातूनच त्यांनी, १५ ऑगस्टला, महान क्रांतिकारक आणि अध्यात्म जीवनातील ऋषितुल्य प्रणेता श्री अरविंदो यांची दीडशेवी जयंती पूर्ण होत असल्याचे सांगितले. हे वर्ष स्वामी दयानंद सरस्वती यांच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष आहे. हे वर्ष राणी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंतीचे अत्यंत पवित्र वर्ष आहे आणि हे वर्ष संपूर्ण देश अत्यंत उत्साहाने साजरे करणार आहे, असे नमूद केले. हे वर्ष, भक्तियोगाची सर्वश्रेष्ठ संत मीराबाई यांच्या ५२५ व्या वर्षाचे पवित्र पर्व आहे, अशी माहिती देऊन देशवासी हे पर्व उत्साहात साजरे करणार असल्याची ग्वाही दिली.
मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेचे कामकाज वारंवार खंडित केले होते.याची नोंद घेत त्यांनी मणिपूर आणि भारताच्या इतर काही भागांमध्ये हिंसेच्या ज्या घटना घडल्या, अनेकांचे जीव गेले आणि माता-भगिनींच्या सन्मानाची हेळसांड झाली; त्यानंतर आता तेथे शांतता प्रस्थापित झाल्याच्या बातम्या सतत येत असल्याचे सांगून देश मणिपूरच्या जनतेच्या सोबत असल्याचे ठासून सांगितले. गेल्या ९ वर्षांत पारतंत्र्यांच्या अनेक खुणा मिटविण्याचे काम रालोआ सरकारने केले आहे. उर्वरित कामे पुढच्या पाच वर्षांत करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी पुढील निवडणुकीतही आमच्याच नेतृत्वाखालील सरकार येणार, याबाबतचा विश्वास प्रकट केला १२०० वर्षांपूर्वी आपण केलेल्या लहानशा चुकीमुळे आपल्यावर पारतंत्र्यात जाण्याची वेळ आली होती. हजार-बाराशे वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झाले. एका छोट्याशा राज्याच्या छोट्या राजाचा पराभव झाला.
मात्र, आपल्याला हे माहीतच नव्हते की, ही एक घटना भारताला हजार वर्षांच्या गुलामीमध्ये जखडून टाकणार आहे. त्यानंतर आपण गुलामीत अधिकाधिक अडकत गेलो, जखडत गेलो. जो परदेशी देशात आला त्याने आपल्याला लुटले, ज्याच्या मनात आले तो आपल्या डोक्यावर येऊन बसला. किती भयानक कालखंड असेल त्या हजार वर्षांचा, असा प्रश्नही त्यांनी यानिमित्ताने देशवासीयांना उपस्थित केला. यापुढे आपण गाफील राहून चालणार नाही. साधीशीही चूक खपवून घेण्यासारखी राहायला नको, असा दम त्यांनी भरला. देश पारतंत्र्यात असला, तरी या कालखंडात कोणताही प्रदेश असा नव्हता, अशी वेळ नव्हती की जेव्हा भारताच्या वीरांनी देशाच्या स्वातंत्र्य संघर्षाची ज्योत तेवत ठेवली नाही; बलिदानाची परंपरा सुरू ठेवली नाही. गुलामीच्या बेड्यांमधून मुक्त होण्यासाठी भारतमाता उठून उभी राहिली होती, झडझडून प्रयत्न करीत होती आणि देशाची नारीशक्ती, देशाची युवाशक्ती, देशातील शेतकरी, गावातील लोक, कामगार, कोणीही भारतीय असा नव्हता, जो स्वातंत्र्याची स्वप्ने बघत जगत नसेल. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्राणार्पण करण्याची तयार असणा-यांची एक मोठी फौजच तयार झाली होती. तुरुंगांमध्ये तारुण्य व्यतीत करणारे अनेक महापुरुष आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रयत्नशील होते,
याचाही लेखाजोखा त्यांनी मांडला.सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे. या कालखंडात आपण जे काम करू, जी पावले उचलू, जितका त्याग करू, जेवढी तपस्या करू, ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’साठी एकामागून एक निर्णय घेऊ. त्यातून येणा-या हजार वर्षांचा देशाचा सुवर्णमय इतिहास अंकुरित होणार आहे, याकडेही त्यांनी देशवासीयांचे लक्ष वेधले. देशात गेल्या ९ वर्षांत राबविण्यात आलेल्या विभिन्न योजनांचा त्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला. तरुणाईसाठी कधी नव्हे एवढ्या संधी भारतात उपलब्ध आहेत, हे सांगितले. स्त्रियांनी पादाक्रांत केलेल्या विभिन्न क्षेत्रांचा त्यांनी उल्लेख केला.९ वर्षांपूर्वी आपण जगाच्या अर्थव्यवस्थेच्या १० व्या स्थानावर होतो. आज ती परिस्थिती बदलली असून आपण आज पाचव्या क्रमांकावर पोहोचलो असून पुढच्या पाच वर्षांत आपण तिस-या स्थानी आलेलो असू, हे सांगताना त्यांच्यातील उत्साह बघण्यासारखा होता. त्यांचे लाल किल्ल्यावरील हे भाषण ऐतिहासिक म्हणावे लागेल.
धबधब्यातून पाणी पडावे, तसे त्यांच्या मुखातून एकेक शब्द बाहेर पडत होता. देशाच्या सीमेवरील खेडी देशातील शेवटचे गाव नसून सूर्याची किरणे प्रथम अंगावर घेणारी ती देशाची पहिली गावे असल्याचे सांगून, याच सीमावर्ती गावातील ५०० सरपंच आज पहिल्यांदा विमानाचा प्रवास करून दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सामील झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे भाषण अमेरिकन संसदेतील निवडक लोकप्रतिनिधीही अतिशय गांभीर्याने ऐकत होते. शेतक-यांच्या खात्यात डीबीटी योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये टाकण्याच्या योजनेतून भ्रष्टाचाराला कशी तिलांजली मिळाली, याचाही उल्लेख त्यांनी केला. मोदींनी भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरणाच्या कुरीतींवर विजय मिळविल्याशिवाय देशवासीयांची स्वप्ने पूर्ण होणार नाहीत, असा इशारा दिला.
देशातील सर्व समस्यांचे मूळ भ्रष्टाचारात असून २०४७ मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल तेव्हा शुचिता, पारदर्शिता आणि निःपक्षतेची सर्वाधिक गरज असेल. त्यासाठी देशवासीयांनी तयार असावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. 2024 आजवर केलेल्या कामांचा आढावा घेतानाच येत्या काळात करावयाची कामेही त्यांनी नमूद केली. वाढई, लोहार, सुतार, गवंडी यांच्यासाठी विश्वकर्मा योजना, जनऔषधी केंद्रांची संख्या १० हजारांहून २५ हजारांपर्यंत नेणे, ग्रामीण महिलांना ड्रोन संचालन आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण, दोन कोटी लखपती दीदींचा संकल्प, शहरात घरे बांधण्यासाठी कर्जावरील व्याजात कपात आणि महागाई रोखण्यासाठी अधिक प्रयत्नांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. एकप्रकारे येणा-या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचा तो एक जाहीरनामाच ठरावा,
अशी त्यांच्या भाषणाची मांडणी होती. देशातील युवकांची स्वप्ने पूर्ण करण्याची आव्हाने पेलण्याचे आश्वासन त्यात होते. बदलत्या जागतिक मांडणीत उद्योजकांसाठी असलेल्या संधी त्यात दडलेल्या होत्या. रोजगाराची क्षेत्रे निर्धारित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला देश पंचनिर्धारांप्रती समर्पित होऊन एकजुटीने आत्मविश्वासासह आज पुढे वाटचाल करतो आहे, हेही सांगितले.