मुंबई : भारत अणि रशिया यांची भागीदारी असलेल्या ‘इंडो-रशियन रायफल प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने भारतीय सैन्याला ३५ हजार ‘एके-२०३’ रायफलची खेप सुपुर्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौर्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीकडून ही घोषणा शुक्रवार, दि. ५ जुलै रोजी करण्यात आली. ‘इंडो-रशियन रायफल प्रायव्हेट लिमिटेड’ हा प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये साकार झाला आहे.
या उपक्रमासाठी २०२१ साली भारत अणि रशियामध्ये करार झाला होता. या प्रकल्पामध्ये रशिया या रायफलचे संपूर्ण तंत्रज्ञान भारताला देणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सहा लाखांहून अधिक रायफल्सचे उत्पादन केले जाणार आहे. या रायफल्स भारतात गेल्या दोन दशकांत वापरत असलेल्या ‘इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टम’ अर्थात ‘इन्सास’ या रायफल्सची जागा घेतील. भारतीय सैन्यदलात या रायफल्स मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
मात्र, या रायफल्समध्ये काही त्रुटी असल्याने या रायफल्स वापरताना अनेक समस्यांचा सामना सैनिकांना करावा लागत असे. त्या तुलनेत ‘एके-२०३’ या रायफल्स अतिशय विकसित असून, आकार, वजन, अचूकता, परिणामकारकता या सगळ्याच बाबींमध्ये या रायफल्स सध्या वापरात असलेल्या ‘इन्सास’ रायफल्सपेक्षा जास्त उजव्या आहेत. दरम्यान, देशात वार्षिक संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यावर्षी देशात १.२७ लाख कोटी रुपयांचे विक्रमी उत्पादन संरक्षणक्षेत्रात झाल्याची माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. गेल्यावर्षी १.८ लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाची संरक्षणक्षेत्रात नोंद करण्यात आली होती. संरक्षणक्षेत्रात उत्पादन वाढवून ‘आत्मनिर्भर’ होण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.