जळगाव: क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्सुकता आणि चांद्रयान चंद्रभूमीवर उतरताच सर्वत्र जल्लोष शहरातील विविध भागात दिसून आला. विविध ठिकाणी हाच विषय दिवसभर चर्चेत होता.अंतराळात भारतीय चांद्रयान पोहोचले तेव्हापासून उत्सुकता होती की, हे यान चंद्रावर केव्हा उतरते. आज बुधवारी हे यान चंद्रावर उतरणार असल्याने खगोलप्रेमींबरोबरच शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गांसह नागरिकांमध्ये या विषयाची उत्सुकता दिसली.
चांद्रयान-३ आज चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार याविषयीच आज विविध क्षेत्रातील नागरिकांमध्ये चर्चा रंगल्याचे चित्र शहरात दिसले. इतकीच काय पानटपरी, चहाटपरी, रिक्षा स्टॉपचालक यांच्यासह बसस्थानक, रेल्वेस्टेशन, बाजारपेठ इत्यादी गर्दीच्या ठिकाणीदेखील भारताच्या चांद्रयान यावरच गप्पा-चर्चा आणि उत्सुकतेबाबतचे वातावरण दिसले. नेहमी शीतलता देणार्या चंद्राबाबत सर्वांनाच आपुलकीचा भाव राहिला आहे. म्हणूनच ‘चंदामामा, अब नही रहा दूर का’, अशी भावना उत्स्फूर्तपणे तरुणी, मुली आणि मुलांमध्ये उमटली.
जय गणेश मंडळातर्फे स्टेशन परिसरात लाईव्ह प्रेक्षपण
चांद्रयान शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर त्याचे थेट प्रेक्षपण दाखविण्याची सुविधा स्टेशन परिसरात जय गणेश मंडळातर्फे करण्यात आली. हा देशवासीयांचा आनंदाचा क्षण नजरेत टिपण्यासाठी नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली होती. सर्व उपस्थित भारत माता की जय नारा देत या आनंदात उस्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसले.
चांद्रयान चंद्रभूमीवर उतरताच याठिकाणी ढोलताशांचा गजर करून कार्यकर्ते,युवकांनी आनंद व्यक्त केला. संदीप दहाड, अरूण लाहोटी, पायल जोशी, जानवी वराडे, साधना दायमा, पोर्णिमा माळी, कोमल पाठक, मालती पांडे, रिध्दी भजनी, टिमा नेतके या तरुणीसह असंख्य महिलांनी या क्षणाचा साक्षीदार होत जल्लोष केला.
चांदोबा आता भारताच्या कवेत – पालकमंत्री
चांद्रयान -३ हे चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्याने देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. देशातील जनतेच्या दृष्टीने ही एक अभिमानास्पद घटना आहे. संपूर्ण देशवासीयांना आणि जिल्हावासीयांना या क्षणाबद्दल अभिनंदन करतो. भारताने चांदोमामालाही आता कवेत घेतले असून, चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश झाला आहे. ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण यशस्वी ठरला असून देशाची स्वप्नपूर्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शास्त्रज्ञ यांच्या कठोर परिश्रमातून हा दिवस देशवासीयांना अनुभवता आला. सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधकांचे त्रिवार अभिनंदन करतो. १४० कोटी देशवासीयांच्यादृष्टीने आजचा दिवस हा जगाच्या इतिहासात सुवर्णक्षण म्हणून नोंदविला जाईल, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.