रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर रविचंद्रन अश्विनने ही घोषणा केली. पाचव्या दिवशी सामना थांबला तेव्हा टीम इंडियाचे सदस्य ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होते.
त्यादरम्यान रविचंद्रन अश्विनने विराट कोहलीला मिठी मारली. यानंतर सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली होती की, अश्विन लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल. सामन्यातील ब्रेक दरम्यान अश्विनने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशीही संवाद साधला. यानंतर काही वेळातच त्यांनी पत्रकार परिषदेत येऊन निवृत्तीची घोषणा केली.
रविचंद्रन अश्विनचा कसोटीतील गोलंदाजीचा विक्रम खूपच प्रभावी आहे. तमिळनाडूच्या या फिरकीपटूने नोव्हेंबर 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि तेव्हापासून तो सातत्याने कसोटी संघात आहे. अश्विनने 106 कसोटी सामन्यात 24.00 च्या सरासरीने 537 विकेट घेतल्या आहेत. यावेळी अश्विनने 37 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. त्याने एका सामन्यात 8 वेळा 10 विकेट्स घेतल्या. त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी 7/59आहे. कोणत्याही कसोटी सामन्यातील त्याची सर्वोत्तम कामगिरी 13/140अशी आहे.
अश्विनने सर्वाधिक प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार 11 वेळा जिंकला आहे, जो मुरलीधरनच्या बरोबरीचा आहे. फिरकीपटू म्हणून, त्याचा गोलंदाजीचा स्ट्राइक रेट50.7 (200+ विकेट) आहे, जो सर्वोच्च आहे. 38 वर्षीय अश्विन भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर एकूण 537 कसोटी विकेट्स आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने भारतासाठी सर्वाधिक म्हणजे 37 वेळा एका डावात 5 बळी घेतले आहेत.