स्वागतासाठी चाहत्यांची प्रतिक्षा वाढली; भारतीय संघ चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकला

ब्रिजटाउन : बार्बाडोसमध्ये टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय पुरुष क्रिकेट संघ चक्रीवादळामुळे तिथेच अडकला आहे. भारतीय संघाला मायदेशी येण्यासाठी ज्या विमानतळावरुन उड्डाण भरायची होती, ते विमानतळ चक्रीवादामुळे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना आपल्या हॉटेलमध्येच अडकून पडावे लागले. बार्बाडोसच्या प्रशासनाने कोणालाही बाहेर निघण्यास बंदी घातली आहे. बार्बाडोसला धडकणाऱ्या या वादळाचे नाव बेरील आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवार, दि. २९ जुलै २०२४ जिंकल्यानंतर भारतीय संघ सोमवार, दि. १ जुलै २०२४ बार्बाडोसहून परतणार होता. यासाठी भारतीय संघ प्रथम बार्बाडोसहून न्यूयॉर्कला जाणार होता तेथून दुबईला जायचे होते. त्यानंतर भारतीय संघ दुबईहून मायदेशी येणार होता. मात्र चक्रीवादळ बेरीलमुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद करण्यात आले आहे.

या विमानतळावरून कोणतीही उड्डाणे सुरू नाहीत. याच कारणामुळे भारतीय संघ हॉटेलमध्ये अडकला आहे. त्यांचे कुटुंबीयही भारतीय संघासोबत आहेत. याशिवाय भारतीय संघाचे सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह हेही येथे अडकले आहेत. हे सर्वजण बार्बाडोसमधील हॉटेल हिल्टनमध्ये थांबले होते.

चक्रीवादळामुळे हॉटेलच्या कामकाजातही अडचणी येत आहेत. आता विमानतळ उघडल्यानंतरच भारतीय संघ परत येऊ शकणार आहे. हॉटेल हिल्टन हे समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ असल्याची माहितीही समोर आली आहे. या चक्रीवादळाचाही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही बार्बाडोस आणि नवी दिल्ली दरम्यान थेट चार्टर फ्लाइटसाठी प्रयत्न केले आहेत. पण त्याचे उड्डाण देखील तेव्हाच शक्य आहे जेव्हा विमानतळ सुरू होईल. अशा स्थितीत तोपर्यंत संघाला बार्बाडोसमध्येच राहावे लागणार आहे. बेरील चक्रीवादळ, ज्यामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला आहे, त्याला अत्यंत धोकादायक श्रेणीत टाकण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे २१० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळाचा परिणाम बार्बाडोस तसेच इतर कॅरिबियन बेटांवर होणार आहे. त्यामुळे समुद्राच्या लाटा ९ फुटांपर्यंत उसळण्याची शक्यता आहे. त्याच्या धडकेमुळे बार्बाडोससह अनेक देशांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे भारतीय चाहत्यांना सुद्धा आपल्या हिरोंची स्वागतासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.