डंबुला : महिला आशिया चषक 19 जुलैपासून सुरू होत आहे. 2004 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी ही स्पर्धेची 9वी आवृत्ती आहे. या स्पर्धेत 9 संघ सहभागी होत आहेत. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त बांगलादेश, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि यूएईचे संघ सहभागी होत आहेत. आतापर्यंत झालेल्या 8 स्पर्धांमध्ये भारतीय संघ 7 वेळा विजयी ठरला आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल.
महिला आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. हा सामना डंबुला येथे होणार आहे. पुरुषांप्रमाणेच भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. 2023 च्या T20 विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यातील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेत झाला होता. आता जवळपास दीड वर्षानंतर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघादरम्यान 2009 मध्ये पहिला T20 सामना खेळला गेला होता. तेव्हापासून दोन्ही संघांमध्ये 14 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 11 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. आशिया चषक 2022 च्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा शेवटचा पराभव केला होता. मात्र, अखेर भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली.