वॉशिंग्टन डीसी : ” भारतात येणाऱ्या या वस्तू केवळ ऐतिहासिक भौतिक संस्कृतीचा भाग नाहीत, तर त्याच्या सभ्यतेचा आणि चेतनेचा आंतरिक गाभा आहे.” असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. मोदी अमेरीकेच्या दौऱ्यावर असताना, अमेरीकन सरकारने भारताच्या २९७ पुरातन कलाकृती आणि वस्तू भारताकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर या गोष्टींची चोरी आणि तस्करी करण्यात आली होती.
या कलाकृती ख्रिस्तपूर्व २००० ते इसवीसनपूर्व १९०० या कालखंडातील आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात या कलाकृतींचा उगम झाला. यातील टेराकोटा कलाकृती, पूर्व भारतातील असल्याची माहिती मिळते. या मध्ये ११व्या शतकातील वाळूच्या खडकापासून बनवलेल्या अप्सरेच्या मूर्तीचा समावेश आहे. त्याच सोबत, कांस्य धातू पासून घडवलेल्या जैन तीर्थंकारांच्या मूर्तीचा सुद्धा समावेश आहे. मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट (एम्ईटी) या संस्थेचा कलाकृतींच्या हस्तांतरणामध्ये महत्वाचा वाटा आहे.
वारसा जतन करण्यास कटीबद्ध!
अमेरीकेचे राजदूत एरिक गार्सेटी माध्यमांशी बोलताना म्हणाले ” सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी भारत आणि अमेरीकेने पुढाकार घेणे ही आनंददायक बाब आहे. दोन्ही देश हा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी कटीबद्ध आहेत ” असे सुद्धा ते म्हणाले. जुलै महीन्यात भारत आणि अमेरीका या दोन देशांमध्ये झालेल्या सांस्कृतिक संपत्ती करारानंतर, तस्करी रोखण्यासाठी घेतलेले हे पाऊल महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरातन कलाकृती भारताला परत केल्या बद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे आभार व्यक्त केले आहे.
भारत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय अशा दोन्ही मार्गांनी, सर्व कलाकृली भारतात परत आणण्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याची माहिती मिळते. “सांस्कृतिक मालमत्तेची पुनर्स्थापना करणे, हा भारत-अमेरिका या देशांच्या सांस्कृतिक सामंजस्य आणि देवाणघेवाणीचा एक महत्त्वाचा पैलू बनला आहे,” असे अमेरीकेन सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. आतापर्यंत अमेरीकन सरकारने ५७८ पुरातन कलाकृती भारताला परत केल्या आहेत.