रामेश्वरमपर्यंत जाणाऱ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूलाचे काम युद्धपातळीवर सुरु

    रामनाथपुरम मंडपम ते रामेश्वरमपर्यंत समुद्रावरील भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल लवकरच साकार होणार आहे. पायाभूत सुविधांसाठीचे रेल्वे बोर्ड सदस्य अनिल खंडेलवाल यांनी जाहीर केले की,तामिळनाडूमधील नवीन पंबन रेल्वे पूल पूर्णत्वाकडे आहे. पुढील दोन महिन्यांत या पुलावरून चाचण्या सुरु होतील. हा पूल रामेश्वरम धामला भेट देऊ इच्छिणाऱ्या भक्तांसाठी वरदान ठरेल.

१९६४च्या चक्रीवादळामुळे धनुषकोडीला भुताटकीचे शहर बनवणाऱ्या पांबन पुलाच्या जागी हा नवा पूल बांधण्यात येणार आहे. ११० वर्षे जुना पूल २३ डिसेंबर २०२२ रोजी सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. २.०८ किमी लांबीच्या नवीन पुलाचे बांधकाम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांनी नियोजन केले होते. मात्र, विविध कारणांमुळे या कामाला विलंब झाला. उर्वरित बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यानचा प्रवास अधिक सुरळीत होणार आहे.

हा सागरी रेल्वे पूल एक आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार आहे. समुद्रसपाटीपासून २२ मीटर उंचीवर नेव्हिगेशनल एअर क्लिअरन्ससह व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज सध्याच्या पुलापेक्षा ३ मीटर उंच असेल. ट्रेन कंट्रोल सिस्टमसह इंटरलॉक केलेल्या इलेक्ट्रो-मेकॅनिकल कंट्रोल सिस्टमचा वापर करून तो ऑपरेट केले जाईल. पांबन रेल्वे सागरी सेतूमध्ये ९९ हॉरीझॉन्टल स्पॅन आहेत. या प्रत्येक स्पॅनची लांबी १८.३ मीटर आहे. तसेच, यामध्ये ७२.५ मीटरचा एक स्पॅन आहे. हा स्पॅन बोटी आणि जहाजांचा मार्ग सुकर करेल. यामधून २२ मीटर उंचीपर्यंतची जहाजे जाऊ शकतात.

या मार्गवर १०० खांब आहेत. हे खांब प्रत्येक १८.३ मीटरवर एक खांब आहे. भविष्यात ही लेन दुप्पट होऊ शकते. पुलाचे २.६५-डिग्री वक्र संरेखन हे या पुलाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. लिफ्ट स्पॅनच्या फिक्सिंग पॉइंटचे बांधकाम लवकरच पूर्ण केले जाईल. रेल्वे विकास निगम लिमिटेड नवीन पूल बांधत आहे. या प्रकल्पासाठी अंदाजित ५३५ कोटी रुपये इतका खर्च करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये नवीन पुलाची पायाभरणी केली. या पुलाचे बांधकाम फेब्रुवारी २०२०मध्ये सुरू झाले. परंतु, कोविड मुळे या कामाला विलंब झाला.