---Advertisement---
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन नवीन युद्धनौका सामील झाल्या. यामध्ये ॲडव्हान्स्ड गाईडेड मिसाईल फ्रिगेट दुनागिरी, सर्वेक्षण जहाज संधोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धनौका अग्रय यांचा समावेश आहे. गार्डन रीच शिपबिल्डिंग ॲण्ड इंजिनिअर्स लिमिटेडने (जीआरएसई) या युद्धनौका बांधल्या असून, स्वदेशी संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रात हे एक महत्त्वपूर्ण यश असल्याचे संरक्षण विभागाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
ॲडव्हान्स्ड गाईडेड मिसाईल फ्रिगेट दुनागिरी ही सर्वांत अत्याधुनिक नौकांपैकी एक आहे. १४९ मीटर लांब आणि ६,६७० टन वजनाची ही फ्रिगेट अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे, यात प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली आणि एकात्मिक युद्ध व्यवस्थापन प्रणालीचा समावेश आहे.
ब्रह्मोस जहाजविरोधी आणि जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांनी, तसेच प्रगत संरक्षण प्रणालींनी सुसज्ज असलेली दुनागिरी नौदलच्या हल्ल आणि संरक्षण क्षमतेमध्ये एक मोठी झेप दर्शवते असे संरक्षण विभागाने म्हटले आहे. ‘संधोधक’ हे एक सर्वेक्षण जहाज आहे. अंदाजे ३,४०० टन विस्थापन आणि ११० मीटर एकूण लांबी असलेले हे सुधारित जहाज अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.
पाळत, शोध, हल्ला करणे अधिक सोपे
अग्रया हे अर्नाळा-श्रेणीतील पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील चौथे जहाज आहे. हे २०१७ मध्ये सेवेतून निवृत्त झालेल्या आयएनएस अग्रया या गस्ती जहाजाची जागा घेईल. हे जहाज पूर्ण-प्रमाणातील पाण्याखालील पाळत, शोध आणि हल्ला, मोहिमा, तसेच विमानांसोबत समन्वित कारवाया करण्यास सक्षम आहे. ते हलक्या वजनाच्या टॉपेंडो व पाणबुडीविरोधी युद्ध क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.









