---Advertisement---
लेह : लडाखमध्ये सीमा रस्ते संघटना अर्थात् बीआरओने बांधलेल्या १२५ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यात दारबुक श्योक दौलत बेग ओल्डी मार्गावर बांधलेल्या ९२० मीटर लांबीच्या श्योक बोगद्याचा समावेश आहे. या बोगद्यामुळे थेट चीनच्या सीमेपर्यंत लष्कराची वाहने नेता येणार असून, लष्करी मोहिमेदरम्यान अतिशय कमी वेळेत सीमेवकर रसद पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे.
राजनाथ सिंह यांच्या हस्ते गलवान स्मारकासह पाच हजार कोटींच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आहे. सीमावर्ती पायाभूत सुविधांना बळकट करण्याच्या योजनांचा भाग म्हणून या प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. उद्घाटनानंतर संबोधित करताना, संरक्षण मंत्री सिंह म्हणाले की, हे प्रकल्प लष्कराच्या शूर सैनिकांना आणि बीआरओच्या त्या जवानांना श्रद्धांजली आहेत जे देशासाठी न थकता काम करतात. त्यांनी पुढे सांगितले की, यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने प्रकल्पांचे उद्घाटन कधीही झाले नव्हते. आज मला देशाला १२५ बीआरओ प्रकल्प आणि एक युद्ध स्मारक समर्पित करताना आनंद होत आहे. सैनिकांचे शौर्य आपल्यासाठी प्रेरणा आहे. सैन्यातील आपले शूर सैनिक आणि तुमच्यासारखे बीआरओचे सर्व कर्मचारी देशासाठी अविरतपणे काम करत आहेत, त्यामुळेच देश सुरक्षित आहे.
देशाच्या विकासाला चालना
संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, लडाखसोबतच आज जम्मू-काश्मीर, चंदीगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममध्येही इतर प्रकल्प देशाला समर्पित केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत, ज्या वेगाने आणि कौशल्याने बीआरओने सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्माण केल्या, त्यामुळे देशाच्या विकासालाही चालना मिळाली. कठीण प्रकल्पांना यशस्वीरित्या पूर्ण करून, बीआरओ आज दळणवळण आणि जोडणीचे दुसरे नाव बनले आहे.
श्योक बोगदा अभियांत्रिकीचा चमत्कार
संरक्षण मंत्री म्हणाले की, श्योक बोगदा अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे. हा बोगदा या भागात प्रत्येक हंगामात विश्वसनीय दळणवळण सुनिश्चित करेल आणि कडाक्याच्या हिवाळ्यात जलद तैनातीची क्षमता वाढवेल. आज आम्ही लडाखमधील दारबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी मार्गावर बांधलेल्या ९२० मीटर लांब श्योक बोगद्याचे उद्घाटन करत आहोत. जगातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक प्रदेशांत बांधण्यात आलेली हा बोगदा अभियांत्रिकीचे अनोखे उदाहरण आहे.









