India vs Australia 1st Test Day 4: जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थ कसोटी विजयी सुरुवात केली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावरील सर्वात मोठा विजय ठरला. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) आशाही जिवंत ठेवल्या आहेत. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला आता आणखी तीन सामने जिंकावे लागणार आहेत.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर चौथ्याच दिवशी 295 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 534 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 58.4 ओव्हरमध्ये 238 धावांवर गुंडाळला. यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच भारत पर्थमधील या ओप्टस स्टेडियममध्ये विजय मिळवणारा हा पहिलाच परदेशी संघ ठरला.
भारताने पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने गुणतालिकेत शिखर गाठले आहे. भारतीय संघाची गुणांची टक्केवारीही 58.33 वरून 61.11 वर सुधारली आहे. ऑस्ट्रेलियाने 13 सामन्यांतील चौथ्या पराभवासह दुसऱ्या स्थानावर घसरण केली. या सामन्यापूर्वी भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 4-0 ने मालिका जिंकायची होती. पहिला सामना जिंकल्यानंतर संघाला आता आणखी तीन सामने जिंकावे लागणार आहेत.