---Advertisement---

IND vs PAK:  भारताचा पाकिस्तानवर ‘विराट’ विजय; कोहलीचे रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड्स

by team
---Advertisement---

भारतीय संघाने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभूत करत उपांत्य फेरीत जवळपास स्थान पक्के केले आहे. या पराभवामुळे पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय असून, पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव आहे.

उद्या (२४ फेब्रुवारी) होणाऱ्या बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर अ गटातून उपांत्य फेरीत कोण पोहोचेल, याचे स्पष्ट चित्र समोर येईल.

विराट कोहलीचा पुन्हा एकदा जलवा

पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवताना विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने शानदार शतक ठोकत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या फलंदाजीमुळे पाकिस्तानला सामन्यात वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली नाही.

सामन्याचा आढावा

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २४२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य ४२.३ षटकांत ४ गडी गमावून सहज पार केले.

भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. रोहितने आक्रमक सुरुवात करत पाकिस्तानी गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ५व्या षटकात शाहिन आफ्रिदीच्या अप्रतिम यॉर्करवर रोहित क्लीन बोल्ड झाला. त्याने १५ चेंडूत २० धावा करत ३ चौकार आणि १ षटकार लगावला.

यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, १८व्या षटकात अब्रार अहमदने शुभमन गिलला त्रिफळाचीत करत पाकिस्तानला महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला. शुभमनने ५२ चेंडूत ७ चौकारांसह ४६ धावा केल्या.

गिल बाद झाल्यानंतर विराटला श्रेयस अय्यरची उत्तम साथ मिळाली. दोघांनी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. विराटने ६२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, तर श्रेयसने ६३ चेंडूत अर्धशतक झळकावले. श्रेयस ६७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ५६ धावा करून बाद झाला.

विराटचे ऐतिहासिक शतक

भारताला विजयासाठी २ धावांची गरज असताना विराटला शतकासाठी ४ धावांची गरज होती. यावेळी विराटने शानदार चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याचसोबत त्याने वनडे कारकिर्दीतील ५१ वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८२ वे शतक पूर्ण केले.

पाकिस्तानच्या गोलंदाजांची कामगिरी

पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने २ गडी बाद केले, तर खुशदील शाह आणि अब्रार अहमद यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मात्र, भारतीय फलंदाजांचा सामना करण्यासाठी त्यांची गोलंदाजी अपुरी पडली.

कोहलीचे रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड्स

विराटने या सामन्यात एकदिवसीय मालिकेतील 14 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने यासह सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने 287 डावात ही कामगिरी केली. तर सचिनने 350 डावात ही कामगिरी केली होती. तसेच विराट हा सचिन आणि कुमार संगकारा या दोघानंतर 14 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा एकूण तिसरा तर पहिला फलंदाज बनला.


विराटने या खेळीदरम्यान अर्धशतक झळकावलं. विराटचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील एकूण 73 वं तर आयसीसी एकदिवसीय स्पर्धेतील 50 वं अर्धशतक ठरलं. विराटने 111 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद शतक केलं. विराटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे एकूण 51 वं तर 82 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. तसेच विराटचं हे चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिलं तर आयसीसी स्पर्धेतील एकूण सहावं शतक ठरलं. सोबतच विराट पाकिस्तानविरुद्ध आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप या तिन्ही स्पर्धेत शतक करणारा पहिला फलंदाज ठरला.़

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment