---Advertisement---
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द झाल्यामुळे फटका बसलेल्या ग्राहकांना ५०० कोटींची भरपाई देणार असल्याची माहिती इंडिगो कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
वैमानिकांच्या सुट्यांशी संबंधित नियमात बदल करण्यात आल्याने गेल्या आठवड्यात सुमारे ४,५०० उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला याचे आम्हाला दुःख आहे. नागरी विमान वाहतूक नियामकाने कंपनीला देशांतर्गत हिवाळी वेळापत्रकात १० टक्के कपात करण्याचा निर्देश दिला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे.
३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी विमाने रद्द झाल्याने ज्या प्रवाशांना फटका बसला त्यांची यादी तयार केली जात आहे. ज्या प्रवाशांची उड्डाणे प्रवासाच्या २४ तास आधी रद्द झाली आणि जे प्रवासी विशिष्ट विमानतळांवर मोठ्या प्रमाणात अडकून पडले अशा प्रवाशांना भरपाई दिली जाणार असून, ही रक्कम ५०० कोटी इतकी आहे असेही निवेदनात नमूद केले आहे.
८२९ प्रवाशांचा सामूहिक खटला
इंडिगोचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना अनेक तास विमानतळांवरच ताटकळत राहावे लागले, याशिवाय कंपनीकडून अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. याविरोधात ८२९ प्रवाशांनी एकत्र येऊन भरपाईसाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ग्राहक संरक्षण वकील असणाऱ्या डॉ. सुधीर शुक्ला यांनी ही माहिती दिली. भरपाई म्हणून प्रत्येक प्रवाशाला पाच लाख रुपये द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली.









