देशाच्या एकता-अखंडतेला घुसखोरांचे मोठे आव्हान, अवैध निर्वासितांमुळे बिघडतेय लोकसंख्येचे संतुलन : पंतप्रधान मोदी

---Advertisement---

 

एकता नगर (गुजरात) : अनेक दशकांपासून घुसखोरी होत असल्याने देशाची अखंडता आणि एकतेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे तसेच अंतर्गत सुरक्षाही धोक्यात आली आहे. देशाच्या अनेक भागात अवैध निर्वासितांमुळे लोकसंख्येचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे देशात एकही घुसखोर राहता कामा नये, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता नगर येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिवस परेड’ निमित्त ते बोलत होते.

देशाने घुसखोरांविरोधात निर्णायक लढा सुरू केला आहे. गेल्या अनेक दशकापासून घुसखोर देशात प्रवेश करीत आहेत. त्यांनी देशाची एकता आणि अंतर्गत सुरक्षेसमोर आव्हान उभे केले आहे तसेच लोकसंख्येचे संतुलन घुसखोरांमुळे बिघडत आहे. त्यामुळे प्रत्येक घुसखोर देशाबाहेर काढला जाईल. प्रत्येक नागरिकाने या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी निर्धार करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

देशातील अन्य संस्थानांप्रमाणे संपूर्ण जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण व्हावे, असे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना वाटत होते, पण याला तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल यांनी देशातील संस्थाने भारतात सामील केली. संपूर्ण काश्मीरही भारतात सामील व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, पंडित नेहरूंनी ती पूर्ण होऊ दिली नाही. काश्मीरचे विभाजन करण्यात आले आणि काश्मीरला स्वतःचा ध्वज आणि घटना मंजूर केली. काँग्रेस पक्षाने केलेल्या चुकीचे परिणाम दशकांपासून देश भोगत आहे. इतिहास लिहिण्यापेक्षा इतिहास घडविण्यावर सरदार पटेलांचा विश्वास होता, असा टोलाही त्यांनी लगावला.

पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ समोर निघालेल्या परेडमध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ आणि एसएसबी या निमलष्करी दलांसह विविध राज्यांमधील पोलिस दलाच्या तुकड्या सहभागी झाल्या होत्या.

‘ऑपरेशन सिंदूर’ मधील वीर परेडमध्ये सहभागी

‘ऑपरेशन सिंदूर मध्ये पराक्रम गाजविलेले आणि शौर्यपदक जिंकलेले सीमा सुरक्षा दलाचे १६ जवान परेडमध्ये सहभागी झाले होते. याशिवाय देशी प्रजातीच्या श्वानांचाही सहभाग होता. मुधोळ आणि रामपूर प्रजातीच्या श्वानांनी याप्रसंगी कौशल्याचे प्रदर्शन केले.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही त्रास दिला.
  • ज्यांना देशाचे विभाजन पुन्हा व्हावे, असे वाटत आहे त्यांचा घुसखोरांना पाठिंबा.
  • घुसखोरांकडून स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गंडांतरः संसाधनाची लूट.
  • यापूर्वीच्या सरकारांचे मतांसाठी घुसखोरीकडे दुर्लक्ष.
  • प्रथमच घुसखोरीविरोधात निर्णायक लढाईला सुरुवात.
  • घुसखोरीला गंभीरतेने घेण्याऐवजी काही पक्षांकडून राजकीय फायद्यासाठी संरक्षण देण्याचे प्रयत्न.
  • मुद्दा गंभीर झाल्यास त्याचा सर्वांनाच धोका.
  • माओवादाचा समूळ नायनाट होईपर्यंत थांबणार नाही.
  • सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जयप्रकाश नारायण यांच्याकडे काँग्रेसचे दुर्लक्ष.
  • ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतातील काही भाग धर्माच्या आधारावर गाळला.
  • अनेक भाषा ह्या भारतीय एकतेचा स्तंभ.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---