राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसविण्यास प्रारंभ : आमदार सुरेश भोळे यांनी केली होती सूचना

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातांवर नियंत्रण राहावे याकरिता आमदार सुरेश भोळे यांनी  प्रशासनाचे लक्ष वेधून महामार्गावर गतिरोधक टाकण्याची विनंती केली होती. अखेर शुक्रवारी  १३ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

मागील १५ दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील खड्डयांमुळे भीषण अपघात होऊन तीन जणांना नाहक आपले प्राण गमवावे लागले. तर काही जण जखमी देखील झाले. या पार्श्वभूमीवर जनमानस संतप्त झाले होते. काही नागरिकांनी आंदोलन देखील केले होते. त्यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हाधिकारी दालनात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध सूचना मांडल्या होत्या. त्यामध्ये महामार्गावरील अपघाती स्पॉटवर गतिरोधक टाकण्यात यावेत असे आ. भोळे यांनी सांगितले होते.

आमदार सुरेश भोळे यांच्या सूचनेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी गतिरोधक टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. हे गतिरोधक बिबानगरपासून कालिका माता मंदिरापर्यंत टाकण्यात येतील अशी माहिती प्रशासनाच्या वतीने मिळत आहे. यामुळे नागरिकांनी आमदार सुरेश भोळे यांचे आभार मानले आहेत.