Devendra Fadnavis नागपूर : बीड आणि परभणी येथील घडलेल्या गंभीर घटनांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, भारतीय संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही. सरकार या घटनांचा गांभीर्याने विचार करीत आहे आणि या संदर्भात सविस्तर चर्चा होईल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानानुसार सभागृहात अपेक्षित चर्चा होणे आवश्यक आहे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता, असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला देखील आवाहन केले की, अशा घटनांबद्दल राजकारण न करता चांगल्या सूचना मांडाव्यात, ज्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी या घटनांचा मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान यावर सविस्तर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.